नाशिक : लव्ह जिहाद आणि धर्मांतरणविरोध कायदा राज्यासह संपूर्ण देशात लागू करण्यात यावा, या मागणीसाठी सकल हिंदू समाजाच्या वतीने येत्या सोमवारी (दि.२८) सकाळी १० वाजता नाशिकमध्ये हिंदू मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. बी. डी. भालेकर मैदान येथून या माेर्चाला सुरुवात होणार आहे. महाराष्ट्रासह देशात विविध ठिकाणी लव्ह जिहाद तसेच धर्मांतरण यांसारख्या घटना समोर येत आहेत. दिल्ली येथे श्रध्दा वालकर हिचे ३५ तुकडे करून खून करण्यात आल्याचे प्रकरण निदर्शनास आले असून, लव्ह जिहादचाच तो एक भाग असल्याचा आरोप केला जात आहे. या प्रकरणामुळे देशभरात संतापाची लाट निर्माण झाली आहे. ठिकठिकाणी आंदोलने, निदर्शने करण्यात येऊन आरोपीला फाशीची शिक्षा देण्यासह लव्ह जिहादविरोधात आणि धर्मांतरणविरोधात कायदा करण्याची मागणी सकल हिंदू समाजातर्फे मूक मोर्चाच्या माध्यमातून केली जाणार आहे. सोमवारी (दि.२८) निघणाऱ्या मोर्चात सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी, कार्यकर्ते तसेच नागरिक सहभागी होणार आहेत.