नवी दिल्ली : दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने ऑस्ट्रेलियन महिलेच्या हत्या प्रकरणातील एका भारतीय व्यक्तीला अटक केली आहे. २०१८ मध्ये क्वीन्सलँड येथे या ऑस्ट्रेलियन महिलेची हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी आरोपी राजविंदर सिंह या भारतीय व्यक्तीला दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या ऑस्ट्रेलियन महिलेच्या हत्या प्रकरणातील आरोपीबद्दल माहिती दिल्यास क्वीन्सलँड पोलिसांनी १० लाख डॉलरचे बक्षीस जाहीर केले होते. याप्रकरणी आत्तापर्यंत क्वीन्सलँड पोलिसांनी जाहीर केलेली सर्वात मोठी रक्कम मानली जाते.
ऑस्ट्रेलियन पोलिसांनी २०१८ मध्ये क्वीन्सलँडमधील एका समुद्रकिनाऱ्यावर २४ वर्षीय ऑस्ट्रेलियन महिलेची हत्या झाल्याचे स्पष्ट केले होते. ही हत्या एका भारतीय वैद्यकीय सहाय्यकाने केली असल्याचेही ऑस्ट्रेलियन पोलिसांनी स्पष्ट केले होते. त्यानंतर संबंधित आरोपी भारतात पळून गेला असल्याचेही सांगण्यात आले होते. त्याला पकडण्यासाठी या हत्या प्रकरणी माहिती देणाऱ्याला १० लाख डॉलर्सचे बक्षीस क्वीन्सलँड पोलिसांकडून जाहीर करण्यात आले होते. याप्रकरणी क्वीन्सलँड पोलिसांनी एका प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, ऑक्टोबर २०१८ मध्ये टोया कॉर्डिंगली तिच्या कुत्र्याला केर्न्सपासून 40 किलोमीटर अंतरावर वांगेटी बीचवर फिरत होती, तेव्हा तिची हत्या झाली. २१ ऑक्टोबर २०१८ रोजी कॉर्डिंग्ले बेपत्ता झाल्याची नोंद झाली. दुसऱ्या दिवशी सकाळी केर्न्सच्या उत्तरेला वांगेटी बीचवर तिचा मृतदेह सापडल्याचेही ऑस्ट्रेलियन पोलिसांनी स्पष्ट केले आहे.