बिबी : दिवसभर शेतात सोयाबीन जमा केल्यानंतर अपेक्षित उत्पन्न मिळत नसल्याचा अंदाज आल्याने युवा शेतकऱ्याने मृत्यूला कवटाळले. लोणार तालुक्यातील गोवर्धन नगरात ही घटना समोर आली आहे. संदिप रमेश चव्हाण(४२, रा.गोवर्धन नगर, लोणार) असे आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याचे नाव आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार संदिप चव्हाण त्याच्या वसंतनगर शिवारातील शेतात सोयाबीन जमा करण्यासाठी गेले होते. यंदा सुरुवातीला झालेला अपुरा पाऊस आणि सोंगणीच्या वेळी झालेली अतिवृष्टी यामुळे सोयाबीनचे गणित हुकले. त्यामुळे अपेक्षित उत्पन्न मिळणार नसल्याने संदीप चव्हाण चिंतेत होते. दिवसभर शेतात काम केल्यानंतर रात्री त्यांनी शेतातच मुक्काम केला. मात्र सकाळी शेतातील निंबाच्या झाडाला गळफास घेऊन त्यांनी आत्महत्या केली. बिबी पोलीस ठाण्यात याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.