अकोला : प्रशिक्षणार्थ्यांनी परिश्रमाने उत्तमोत्तम कौशल्य आत्मसात करून स्वतःच्या विकासासोबतच देशाच्या आर्थिक व औद्योगिक विकासाला हातभार लावा, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटीयार यांनी केले. दिक्षांत समारोहात डायरेक्टर जनरल ऑफ ट्रेनिंग, ऑल इंडिया ट्रेड टेस्टमध्ये उत्तीर्ण झालेल्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या प्रशिक्षणार्थ्यांना राष्ट्रीय व्यवसाय प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, प्र.अपर जिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे, रोजगार, स्वयंरोजगार, उद्योजकता व नाविन्यता विकास विभागाचे सहायक आयुक्त द.ल. ठाकरे, महाराष्ट्र राज्य विद्युत निर्मिती पारसचे मुख्य अभियंता एस. एस. सोनपेठकर, अकोला इंडस्ट्रीयल असोशिएशनचे प्रतिनिधी तथा उद्योजक श्रीकर सोमण, संस्थेचे प्राचार्य, संस्था व्यवस्थापन, समितीचे सदस्य उपस्थित होते.
निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे म्हणाले की, जगभरातून कुशल मनुष्यबळाची वाढती मागणी लक्षात घेता आपल्याला खूप संधी उपलब्ध आहेत. प्रशिक्षणार्थ्यांनी प्रयत्न आणि कष्ट यांची योग्य सांगड घालून यशस्वी उद्योजक बनू शकतात. तसेच सहाय्यक आयुक्त द.ल. ठाकरे यांनी जगाची ‘स्कील कॅपीटल’ भारताला बनविण्याचे स्वप्न सत्यात उतरविण्यासाठी विशेष प्रयत्नांची गरज असल्याचे प्रतिपादन केले. तसेच अकोला इंडस्ट्रीयल असोशिएशनचे प्रतिनिधी, संस्था व्यवस्थापन समितीचे सदस्य व उद्योजक श्रीकर सोमण यांनी मिळालेल्या कौशल्यांचे योग्य उपयोग करून प्रामाणिक प्रयत्नांनी यशस्वी उद्योजक होऊ शकलो. अशक्य अस काहिच नाही फक्त सकारात्मक पाऊल उचलणे महत्त्वाचे आहे, असे मनोगत त्यांनी व्यक्त केले. औद्योगिक प्रशिक्षण संस्था, उद्योगांना कुशल मनुष्यबळ पुरवून देशाच्या आर्थिक तथा औद्योगिक विकासात महत्वाची भूमिका बजावतात. दरवर्षी देशभरातील 14 हजार आयटीआयमधून सुमारे 22 लाख प्रशिक्षणार्थी आपला अभ्यासक्रम पूर्ण करतात. तर महाराष्ट्रातून 995 आयटीआयमधून 419 शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था असून दरवर्षी 2 लक्ष 50 हजार प्रशिक्षणार्थी यशस्वी प्रशिक्षण पूर्ण करतात. संस्थेच्या उपलब्धी, परिणाम व संस्थेने केलेल्या यशस्वी प्रयत्नांबाबत अहवाल सादर करून यशस्वी प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या सर्व प्रशिक्षणार्थ्यांचे अभिनंदन प्राचार्य पी. एन. जयस्वाल यांनी केले. दिक्षांत समारोह सोहळ्याची प्रस्तावना संस्थेचे गट- निदेशक कौशलाचार्य मंगेश पुंडकर यांनी केले. तर सूत्र संचालन संदिप पीसे व आभार प्रदर्शन संस्थेचे गटनिदेशक योगेश घुगे यांनी केले. सर्व निदेशक, शिल्प निदेशक, कर्मचारी यांनी दीक्षांत समारोह सोहळा यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.