नगर : जमीन खरेदीत 11 लाख रुपयांची फसवणूक झाल्याप्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सावेडीतील प्रवीण रमेशचंद्र अजमेरा यांची फसवणूक झाली असून त्यांनी फिर्याद दिली आहे. शेख अख्तर उस्मान (रा. नवाबपुरा, औरंगाबाद), कृष्णा शिंदे (रा. भक्तिनगर, सिडको, औरंगाबाद) अशी गुन्हा दाखल झालेल्या दोघांची नावे आहेत. अजमेरा पेशाने व्यावसायिक आहेत. कृष्णा शिंदे याने औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यातील सय्यदपुरा येथे गट नंबर 64 मधील सहा एकर जमीन 11 लाखांत विक्रीस असल्याचे अजमेरा यांना सांगितले. प्रवीण अजमेरा यांनी 29 जानेवारी 2021 रोजी त्यांच्या बँक खात्यातून शेख याच्या खात्यात आरटीजीएसद्वारे 11 लाख रुपये पाठविले होते. त्यानंतर एका महिन्यात जमिनीचा व्यवहार करून देणार असल्याचे शेख याने अजमेरा यांना सांगितले होते. दरम्यान, एक महिन्यात जमिनीचा व्यवहार करू न दिल्याने अजमेरा यांनी शेख याच्याकडे 11 लाख रूपयांची मागणी केली. मात्र, त्यांना पैसे परत मिळाले नाही. तसेच शेख याने दिलेले धनादेश सुद्धा वटले नाहीत. त्यानंतर अजमेरा यांनी तोफखाना पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.