नागपूर : अल्पवयीन मुलाशी ठेवलेल्या शारीरिक संबंधातून ती गर्भवती राहिली. परंतु शरीर संबंध सहमतीने ठेवल्याने मुलीने अज्ञात प्रियकराविषयी माहिती देण्यास नकार दिल्यामुळे पोलिसांसमोर आरोपीचा शोध कसा घ्यावा या विषयी पेच निर्माण झाला आहे. जिल्ह्यातील कळमेश्वर पोलिस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अकरावीत शिकणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थिनीने आईकडे पोट दुखत असल्याची तक्रार केली. आईने डॉक्टरांकडे नेल्यानंतर मुलगी पावणेपाच महिन्यांची गर्भवती असल्याचे लक्षात आले. त्यामुळे मुलीच्या पालकांना धक्का बसला. याप्रकरणी अज्ञात आरोपीविरुद्ध कळमेश्वर पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल केला.
पीडित 16 वर्षीय मुलगी कळमेश्वर पोलिस ठाण्याच्या हद्दीत राहते. तिचे अचानक पोट दुखायला लागले. त्यामुळे मुलीला डॉक्टरांकडे नेले. डॉक्टरांनी तपासणी केली व मुलगी पावणेपाच महिन्यांची गर्भवती असल्याचे सांगितले. मात्र, आईचा विश्वास बसेना. त्यामुळे तिने डॉक्टरांना पुन्हा तपासणी करण्याची विनंती केली. डॉक्टरांनी पुन्हा तपासणी करून मुलगी गर्भवती असल्याचे निदान करून पोलिस ठाण्यात जाण्याचा सल्ला दिला. हे ऐकून आईला धक्का बसला. मुलीला घरी आणल्यानंतर हा काय प्रकार असल्याचे तिला विचारले. परंतु, मुलीने काहीही बोलण्यास नकार दिला. प्रियकराचे नाव सांगण्यास मुलगी तयार नव्हती. आम्ही दोघांनी सहमतीने शारीरिक संबंध केल्याचे सांगून प्रियकराचे नाव सांगणार नसल्याचे मुलीने आईला सांगितले. सूत्राच्या माहितीनुसार, मुलगी दहावीत असतानाच तिची एका युवकासोबत मैत्री झाली होती. दोघांचे सूत जुळले आणि प्रेमसंबंध निर्माण झाले.
शाळा सुटल्यानंतर दोघांच्या भेटी वाढत गेल्या. गेल्या 1 एप्रिल रोजी दोघांनी घरी कुणी नसताना शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्यानंतर दोघेही वारंवार घरी कुणी नसताना भेटत होते. त्यातून मुलगी गर्भवती झाली. परंतु, पहिले दोन महिने मुलीच्या लक्षात आले नाही. त्यानंतर गर्भवती असल्याची माहीत झाल्यानंतर ती घाबरली. परंतु, कोणाला सांगितल्यास बदनामी होईल, अशी भीती वाटल्याने मुलीने कुठेही वाच्यता केली नाही. चार महिने झाल्यानंतर मुलीचे पोट दुखत असल्याच्या कारणावरून आईला हा प्रकार आला. पोलिसांनी या बाबतीत विचारले असता मुलीला मानसिक धक्का बसल्यामुळे ती आरोपी विरूद्ध काहीही सांगण्यास तयार नसल्याचे सांगितले. पीडित मुलगी सावरल्यानंतर तिला विश्वासात घेऊन विचारपूस करू, असे पोलिस उपनिरीक्षक प्रियंका गेडाम यांनी सांगितले.