पुणे : पावसाळी लिंबांचा हंगाम अखेरच्या टप्यात आला आहे. नवीन हंगाम सुरू होण्यास आणखी दोन ते तीन महिन्यांचा कालावधी लागणार असल्याने लिंबांचे दर दिवाळीपर्यंत तेजीत राहणार आहे.उन्हाळ्यात लिंबांचा तुटवडा जाणवतो. यंदा उन्हाळ्यात लिंबांना उच्चांकी दर मिळाले. किरकोळ बाजारात एका लिंबाची विक्री दहा रुपयांना करण्यात आली. त्यानंतर जून महिन्यात लिंबांचा हंगाम सुरू झाला. त्यानंतर लिंबांच्या दरात घट झाली. पावसाळ्यातील लिंबांचा हंगाम ऑगस्ट महिन्यापर्यंत सुरू राहतो. लिंबांचा हंगाम अखेरच्या टप्प्यात आला असून पुढील दोन ते तीन महिने लिंबांच्या दरात वाढ होणार आहे, अशी माहिती श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डातील लिंबू व्यापारी रोहन जाधव यांनी दिली. सोलापूर जिल्ह्यातील बार्शी, नगर जिल्ह्यातील श्रीगोंदा परिसरात लिंबांची मोठी लागवड करण्यात येते.
दररोज साधारणपणे एक हजार ते दीड हजार गोणी लिंबांची आवक फळबाजारात होते. एका गाेणीत आकारमानानुसार ३५० ते ५०० लिंबे असतात. सध्या बाजारात एका गाेणीस प्रतवारीनुसार ३०० ते ६०० रुपये दर मिळत आहे. लिंबांची आवक कमी झाल्यानंतर गाेणीचे दर ५०० ते ७०० रुपयांपर्यंत राहतील. किरकोळ बाजारात सध्या एका लिंबांचे दर एक ते दोन रुपये आहेत. आवक कमी झाल्यानंतर लिंबाच्या दरात वाढ होईल. साधारणपणे एका लिंबाचे दर प्रतवारीनुसार तीन ते चार रुपयांपर्यंत राहतील, असे त्यांनी सांगितले. लिंबांचा हंगाम जून ते ऑगस्ट महिन्यापर्यंत असतो. त्यानंतर थंडीत लिंबांचा दुसऱ्या टप्प्यातील हंगाम सुरू होताे. नाेव्हेंबरमध्ये लिंबांचा दुसरा हंगाम सुरू होतो. जानेवारी महिन्यापर्यंत हंगाम सुरू असतो. या काळात लिंबांची लोणचे उत्पादक खरेदी करतात.