बुलढाणा : सर्वत्र असलेले धार्मिक कट्टरतेचे वातावरण आणि जातपातीच्या भिंती उंच होत असताना, मेहकर तालुक्यातील बेलगाव येथे वर्षानुवर्षे सामाजिक ऐक्य आणि सर्वधर्म समभावरूपी पोळा साजरा करण्यात येत आहे. काल (शुक्रवार) देखील यंदाचा पोळा पारंपरिक आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात आला. कट्टरपंथीयांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणाऱ्या या पोळ्याची सुरुवात गावातील हनुमान मंदिरापासून होऊन समारोप रशिद मियाँच्या दर्ग्याजवळ होतो. दुपारी ४ वाजताच्या आसपास गावातील सर्व शेतकऱ्यांनी आपले बैल नटून सजवून एकत्र आणले. पोळ्याचे मानकरी श्रीराम नत्थूजी वानखेडे यांचे पुत्र रितेश वानखेडे यांचा मानाचा बैल पुढे आणि मागे सर्व बैल असा लवाजमा हनुमान मंदिराजवळ जमला.
येथून ढोलाच्या तालावर ही धावती मिरवणूक रशिद मियाँच्या दर्ग्याजवळ दाखल झाली. सर्व जातीधर्माचे आराध्य असलेल्या मंदिर व दर्ग्याजवळ पूजन, आरती, मंत्रोच्चार पार पडले. नंतर मग शेतकरी आपले बैल गावात घेऊन फिरण्यासाठी रवाना झाले. सर्व जातीच्या घरी बैलांचे पूजन होऊन त्यांना पुरणपोळीचा नैवेद्य देण्यात आला. आत्ताच्या पिढीतील मानकरी रितेश श्रीराम वानखेडे यांनी किमान ३ पिढ्यांपासून गावातील पोळा असाच सामाजिक एकोप्याने साजरा करण्यात येतो असे सांगितले. गावातील वयोवृद्धांनी दिलेल्या माहितीनुसार, दर्गासुद्धा हिंदू व मुस्लीम बांधवांनी मिळून बांधला आहे. हा एकोपा केवळ पोळ्यापुरताच मर्यादित नसून वर्षभर जोपासला जातो. सर्व सणात सर्व गावकरी सहभागी होतात. गावातील गजानन महाराज मंदिरात सकाळी व संध्याकाळी ७ वाजता आरती घेण्यात येते. त्यावेळी अजाण किंवा बुद्ध विहारात उपासना होत नाही. तर अजाणच्या वेळी मंदिरात शांतता ठेवण्यात येते. विहारात उपासना किंवा अन्य धार्मिक विधी होत असेल तेव्हा मंदिर, मशीदमध्ये कोणताही विधी न करण्याचा अलिखित नियम कटाक्षाने पाळला जातो.