नवी दिल्ली : उत्तराखंडमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. पावसामुळे अनेक भागात दरडी कोसळण्याच्या घटना समोर आल्या आहेत. त्याचबरोबर मुसळधार पावसामुळे कोणताही अनुचित प्रकार घडण्याची शक्यता लक्षात घेऊन केदारनाथ यात्रा थांबवण्यात आली आहे. रुद्रप्रयाग जिल्हा प्रशासनाच्या आदेशानुसार सोनप्रयागमध्ये यात्रेकरूंना थांबवण्यात आले आहे. उत्तराखंडमध्ये पावसाने कहर केला आहे. राज्यभरात नद्या-नाले तुंबले आहेत. पावसामुळे अनेक भागात भीषण अपघात झाले आहेत. पावसाच्या पार्श्वभूमीवर आपत्ती व्यवस्थापन विभागाला सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. त्याचवेळी, मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर रुद्रप्रयाग जिल्हा प्रशासनाने केदारनाथ यात्रा तात्पुरती थांबवली आहे. हवामान योग्य झाल्यानंतरच प्रवाशांना सोनप्रयागच्या पलीकडे पाठवले जाईल. सध्या सर्व प्रवासी सोनप्रयागमध्येच आहेत. मुसळधार पावसामुळे झालेल्या भूस्खलनामुळे राज्यभरातील १२२ हून अधिक रस्ते बंद आहेत. अनेक मुख्य रस्तेही बंद आहेत. अनेक ठिकाणी डोंगरावरून सतत ढिगारा पडत आहे. चमोली जिल्ह्यात ऋषिकेश-बद्रीनाथ महामार्ग बंद आहे.


