महेश निमसटकर
तालुका प्रतिनिधि भद्रावती
भद्रावती : छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार समाजाला प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन केंद्रीय मानवाधिकार संघटना नवी दिल्लीचे विदर्भ प्रदेश अध्यक्ष डॉ.अंकुश आगलावे यांनी भद्रावती तालुक्यातील पाटाळा येथे केले. ते टायगर गृपच्या पाटाळा शाखेच्या उद्घाटनाप्रसंगी उद्घाटक म्हणून बोलत होते. ते पुढे म्हणाले की, टायगर गृपच्या सदस्यांनी आणि मित्रपरिवारांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आत्मसात करून सामाजिक कार्य केले पाहिजे. तसेच त्यांचे कार्य आणि गुण यांचा आदर्श बाळगला पाहिजे. या शाखेच्या माध्यमातून भविष्यात गोरगरीबांची सेवा घडण्याचे कार्य होणार आहे. गरजुंना मदत करण्याची भावना गृपच्या माध्यमातून रुजवून सामाजिक कार्य घडणार आहे असा विश्वासही डाॅ.अंकुश आगलावे यांनी यावेळी व्यक्त केला. ग्राम विकास विद्यालयाच्या खुल्या पटांगणावर आयोजित या उद्घाटन सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी आकाश ठावरी होते. तर प्रमुख अतिथी म्हणून टायगर गृप चंद्रपूरचे अध्यक्ष अनिल जाधव, रिषभ रिठ्ठे, माजरीचे ठाणेदार विनीत घागे, टायगर गृप जिल्हा चंद्रपूरचे पदाधिकारी सलिम पठाण, वरोरा तालुका प्रमुख बाळा चांभारे, शहर प्रमुख मारोती नामे, पाटाळाचे सरपंच विजय वानखेडे, उपसरपंच विद्या आवारी, ग्रा.पं.सदस्य संदीप एकरे, शिल्पा भोस्कर मंचावर उपस्थित होते. यावेळी आकाश ठावरी आणि रिषभ रिठ्ठे यांनीही मोलाचे मार्गदर्शन केले. कार्यक्रम यशस्वी करण्याकरीता टायगर ग्रुपच्या सदस्यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाला पाटाळा गावातील ज्येष्ठ नागरिक, युवावर्ग मोठया संख्येने उपस्थित होते.