भद्रावती येथील आढावा बैठकीत आमदार प्रतिभाताई धानोरकर यांची माहिती
महेश निमसटकर
शहर प्रतिनिधी भद्रावती
भद्रावती,दि.२:-भद्रावती तथा वरोरा तालुक्यातील सध्याची कोरोना प्रादुर्भावाची स्थिती लक्षात घेता या दोन्ही तालुक्यातील व्यवस्थापनासाठी आमदार निधीतून एक कोटीचे नियोजन करण्यात आले असल्याची माहिती भद्रावती नगर परिषद कार्यालय येथील अधिकाऱ्यांसोबत दि.२१ ला घेण्यात आलेल्या एका आढावा बैठकीतून आ.प्रतिभा धानोरकर यांनी दिली.सदर बैठकीला खासदार बाळू धानोरकर, आमदार प्रतिभा धानोरकर, नगराध्यक्ष अनिल धानोरकर यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच बैठकीत स्थानिक आरोग्य अधिकाऱ्यांनी भद्रावती तालुक्यातील आरोग्य स्थितीची माहिती देऊन तुटवडा असलेले विविध साहित्य द्यावे अशी मागणी केली. त्यात ग्रामीण भागातील कोविड प्रभावित रुग्णांना उपचारासाठी शहरातील उपचार केंद्रावर स्थानांतरित करण्यासाठी एका स्वतंत्र वाहनांची मागणी करण्यात आली.याशिवाय कार्गींन मशीन मोठे व लहान स्वरूपाचे आक्सिजन सिलेंडर, एक हजार पीपीई किट, ऑक्सिमिटर, एन 95 मास्क, ७ हजार हॅन्डग्लोज तथा इतर साहित्याची गरज असून त्या उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली. या सर्वाचे नियोजन करून तालुक्यात कोणत्याही प्रकारचे आरोग्य विषयक साहित्याची कमतरता पडणार नाही असे आश्वासन यावेळी प्रतिभा धानोरकर यांच्याकडून देण्यात आले.याशिवाय तालुक्यातील कोविड रुग्णांची पूर्ण व्यवस्था व उपचार तालुका पातळीवरच करावी अशा सूचना यावेळी खासदार बाळू धानोरकर यांनी आरोग्य अधिकाऱ्यांना दिल्या.त्यासोबतच कोणत्याही नागरिकांनी घाबरून जाऊ नये मी सैदव आपल्या पाठीशी असल्याचे आश्वासन नागरिकांना दिले.
सदर बैठकीला तहसीलदार महेश शितोळे, वैद्यकीय अधिकारी डॉ. मनीष सिंग, डॉ. नितीन सातभाई आणि विविध विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.यावेळी कोविड उपचार केंद्रावर जावून खासदार बाळू धानोरकर व आमदार प्रतिभा धानोरकर यांनी केंद्राची पाहणी केली. तेथील परिस्थिती जाणून घेतली व रुग्णांची विचारपूस केली.