अकोला : शिक्षणासाठी युक्रेनमध्ये असलेल्या अकोला जिल्ह्यातील मुळ रहिवासी असलेल्या पाचही विद्यार्थी स्वदेशात परत आले असून ते आपल्या नातेवाईकाकडे पोहोचले आहे. त्यातील दोघे अकोला जिल्ह्यात स्वगृही पोहोचले असून मोहित विजय मालेकर व अब्दुस साबुर अहमद अशी त्यांची नावे आहेत. जिल्हाप्रशासनाच्या वतीने जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी त्यांचे स्वागत केले व पुढील वाटचालीकरीता शुभेच्छा दिल्या.
यासंदर्भात जिल्हा प्रशासनाने कळविलेल्या माहितीनुसार, मोहित विजय मालेकर व अब्दुस साबुर अहमद हे विद्यार्थी अकोला येथे स्वगृही पोहचले आहे. तर उर्वरित हुसेनउल्ला खान हे मुंबई येथील त्यांचे भावाच्या घरी पोहचले आहे. जॅक निक्सन हे पुणे येथे मामाच्या घरी पोहचला आहेत. तर प्राप्ती भालेराव ही विद्यार्थिनी दिल्ली येथील महाराष्ट्र सदन येथे पोहचले आहेत, असेही प्रशासनाने कळविले आहे.
अकोला येथे स्वगृही पोहोचले मोहित विजय मालेकर व अब्दुस साबुर अहमद यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
मोहित विजय मालेकर– मी एम.बी.बी.ए.स व्दितीय वर्षाच्या अभ्यासक्रमाकरीता युक्रेन येथे शिक्षण घेत आहे. रशियाव्दारे युक्रेनवर हल्ला झालावर युक्रेन सोडून पोलंडच्या सिमेवर जाण्याच्या सूचना जारी झाल्या. आम्ही लगेच पोलंडच्या सिमेकडे निघालो. पोलंडच्या सिमेवर युद्धजन्य परिस्थितीमुळे मोठ्या प्रमाणात गर्दी होवून गदारोळ निर्माण झाल्यामुळे आम्हाला सीमा पार करता आले नाही. त्यामुळे आम्ही पुन्हा युक्रेन येथे परत आलो. त्यानंतर तीन दिवसांनी युक्रेन-पोलंड सीमा पार करुन पोलंड येथे पोहोचलो. सीमा पार केल्यानंतर भारतीय दुतावास यांनी आमची राहण्याची, जेवणाची चांगली व्यवस्था केली. त्यानंतर सैनिक विमानाने आम्हाला दिल्ली येथे आणण्यात आले. दिल्ली येथे आल्यानंतर महाराष्ट्र शासनाव्दारे आम्हाला महाराष्ट्र सदन येथे थांबवले. त्यानंतर आधी नागपूर आणि मग अकोला येथे स्वगृही पोहोचवले. यादरम्यान जिल्हाधिकारी कार्यालयाचे अधिकारी आमच्या सतत संपर्कात होते. त्यामुळे माझ्या आई-वडीलांना खूप धीर मिळत होता.
अब्दुस साबुर अहमद- एम.बी.बी.एस. प्रथम वर्षाच्या अभ्यासक्रमाकरीता युक्रेन येथे शिक्षण घेत आहे. रशियाव्दारे हल्ला झाल्यानंतर आम्ही पोलंड येथे पोहोचलो. पोलंडच्या सिमेवर भारतीय दुतावास यांनी पोलंडच्या रेजीजो येथे राहणाची व जेवण्याची उत्तम व्यवस्था केली. त्यानंतर पोलंड येथून विशेष विमानाने दिल्ली येथे आणण्यात आले. दिल्ली येथून नागपूर मार्गे अकोला येथे स्वगृही पोहोचलो. भारतीय दुतावास व जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सहकार्याने आम्ही स्वगृही पोहोचू शकलो.