अकोला,दि.8 – जिल्हा स्त्री रुग्णालयातील बोलका वॉर्डाप्रमाणेच रुग्णालयातील सर्व वार्डात आधुनिक सोईसुविधा निर्माण करु, अशी ग्वाही राज्याचे जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, शालेय शिक्षण, महिला व बालविकास, इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण, कामगार राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी दिली.
जिल्हा स्त्री रुग्णालयातील ‘बोलका वार्डाचे’ लोकार्पण आज पालकमंत्री कडू यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी निमा अरोरा, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. वंदना पाटोकार, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अनंत गणोरकर, जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या अधीक्षक डॉ. आरती कुलवाल, डॉ. संगीता साने, प्रशाकीय अधिकारी आप्पा डावरे, जिल्हा स्त्री रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी व परिचारिका उपस्थित होते.
पालकमंत्री ना. ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांच्या हस्ते जिल्हा स्त्री रुग्णालयातील दोन स्वतंत्र ‘अक्षरा व आनंदी’ वार्डाचे लोकार्पण करण्यात आले. जिल्हा स्त्री रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी व नर्सेच्या सहकार्याने बोलका वार्ड अत्यंत सुंदर व सर्व सोईसुविधायुक्त निर्माण झाले असून यांचा लाभ जिल्ह्यातील महिला व नवजात बालकांना होईल. रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांना नक्कीच या सुविधेमुळे आनंद घेवूनच जाईल. अशा प्रकारच्या वार्डाचे निर्माण रुग्णालयातील सर्व वार्डात करणाचा निर्धार यावेळी व्यक्त केला. महिला व नवजात शिशूच्या सर्वागिण विकास व आरोग्य शिक्षणाचा उपक्रम अत्यंत स्तुत्य आहे. जिल्हा स्त्री रुग्णालय हे प्राण वाचविण्यासह जीवनिर्मिती करण्याचे पवित्र ठिकाण, असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री बच्चू कडू यांनी केले.
प्रसुतिनंतर माता व नवजात बालकाना आरोग्यविषयक समस्यांना सामोरे जावे लागतात. या समस्या आरोग्य शिक्षणाच्या अभावी निर्माण होत असून या समस्यांच्या निराकरणासाठी आरोग्य शिक्षण मिळणे अत्यावश्यक आहे. याकरीता जिल्हा स्त्री रुग्णालय येथे 40 खाट क्षमतेच्या ‘अक्षरा व आनंदी’ अशा दोन बोलक्या वार्डाची निर्मिती करण्यात आले. यावार्डात विविध फलके, चित्र, बॅनर, डिजीटल सूचना बोर्ड, म्युझीक सिस्टिम व एलईडी टिव्हीच्या माध्यामातून आरोग्य शिक्षण देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. यामध्ये स्तनपान कसे करावे, मातेचा पोषण आहार, बाळाची काळजी, स्त्रीयामधील कर्करोग, मानसिक आजार, कुंटूंब नियोजन व विविध आजारापासून बचावासंबंधीची माहिती देण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या अधीक्षक डॉ. आरती कुलवाल यांनी दिली.