विकास खोब्रागडे
जिल्हा प्रतिनिधी, चंद्रपुर
चंद्रपुर/- सविस्तर घटना अशी की, दिनांक 01/09/2021 रोजी रात्रौ 10/00 वाजताचे सुमारास जामा मस्जिद चिमूरचे इमाम श्री. अनिस जमिल शेख हे घरी जेवण करून मस्जिदचे लाईट बंद करण्याकरिता मस्जिदकडे आले असता त्यांना मस्जिदचे समोर एक टाटा इंडिगो कंपनीचे सिल्व्हर रंगाची फोर व्हीलर गाडी उभी दिसली. मस्जिदचे आतील लाईट सुरू असल्याने ते बंद करण्याकरिता इमाम मस्जिदचे आत प्रवेश करताच त्यांना एक अनोळखी पांढऱ्या रंगाचा कुर्ता पैजामा, डोक्यावर पांढऱ्या रंगाची गोल टोपी घातलेला इसम मस्जिद मधील दान पेटीजवळ उभा दिसला त्यास काही बोलण्याचे आत तो घाईगडबडीने धावत बाहेर आला व मस्जिद बाहेर उभी असलेल्या फोर व्हिलर गाडीत बसून पळून गेला. इमाम यांनी तात्काळ पोलीस स्टेशन चिमूर येथे फोनद्वारे माहिती देऊन दान पेटीची पाहणी केली असता दानपेटी नेहमीच्या ठिकाणावरून हलवून त्यामधील अंदाजे 2000 ते 2500 रुपये चोरीस गेल्याचे समजले. प्राप्त माहितीवरून चिमूर पोलिसांनी वेळीच तपासाचे चक्र फिरवून सहा. पोलीस निरीक्षक मंगेश मोहोड, पोलीस उपनिरीक्षक अलीम शेख, सहा. पोलीस उपनिरीक्षक विलास सोनूले, हवालदार विलास निमगडे, नाईक पोलीस अंमलदार कैलास आलाम, पोलीस अंमलदार सचिन खामनकर, शैलेश मडावी, सतिश झिलपे चालक पोलीस अंमलदार शरीफ शेख यांनी आरोपी पळून गेलेल्या दिशेने पाठलाग केला व शंकरपूर चौकी पोलिसांच्या मदतीने एक तासाचे आत आरोपीस ताब्यात घेतले. चोरी करणाऱ्या आरोपीचे नाव उमेरखा सजावरखा पठाण असून तो जफरनगर, यवतमाळ येथील रहिवासी आहे. आरोपी विरुद्ध पोलीस स्टेशन चिमूर येथे कायदेशीर गुन्हा नोंद करण्यात आला असून पोलीस निरीक्षक मनोज गभने, ठाणेदार पोलीस स्टेशन चिमूर यांचे मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक सुशीलकुमार सोनवणे हे गुन्ह्याचा पुढील तपास करीत आहेत.