मनरेगाच्या विहीर योजनेत भ्रष्टाचाराचा आरोपशेतकऱ्यांकडून लाचेची मागणी; निष्पक्ष चौकशीसाठी मनसेची मागणी
प्रमोद रामटेके तालुका प्रतिनिधी पांढरकवडा
पांढरकवडा : पांढरकवडा पंचायत समिती अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या ‘मनरेगा’ विहीर योजनेत गंभीर अनियमितता व भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनाचे तालुकाध्यक्ष अश्विन मुरलीधर ठाकरे यांनी केला आहे. याबाबत त्यांनी ग्रामीण विकास विभागाच्या प्रधान सचिवांना निवेदन सादर करून तात्काळ चौकशीची मागणी केली आहे.शासनाच्या ‘मनरेगा’ योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना विहिरी मंजूर करून सिंचन सुविधा उपलब्ध करून देण्याचा उद्देश असताना, प्रत्यक्षात काही अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून शेतकऱ्यांचे आर्थिक शोषण केले जात असल्याचा गंभीर आरोप निवेदनात करण्यात आला आहे. विहीर मंजुरीसाठी शेतकऱ्यांकडून १० ते १५ हजार रुपयांपर्यंत लाचेची मागणी होत असल्याचेही नमूद करण्यात आले आहे. निवेदनानुसार, ठराविक ठेकेदारांमार्फतच विहिरीची कामे करण्यासाठी दबाव टाकला जात असून, स्वतः काम करणाऱ्या शेतकऱ्यांना तांत्रिक कारणे दाखवून त्रास दिला जात आहे. त्यामुळे अनेक शेतकरी मानसिक व आर्थिक अडचणीत सापडल्याचे चित्र आहे.याशिवाय, विहिरीचे काम पूर्ण झाल्यानंतरही संबंधित मस्टर काढण्यात अडथळे निर्माण केले जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. अनेक प्रकरणांमध्ये मस्टर दीर्घकाळ प्रलंबित ठेवण्यात येत असून, परिणामी अनेक शेतकऱ्यांचे ‘वर्क कोड’ सिस्टिममधून वगळले गेले आहेत. त्यामुळे पात्र शेतकरी शासनाच्या अनुदानापासून वंचित राहत असल्याची गंभीर बाब समोर आली आहे. यापूर्वीही या विभागात कोट्यवधी रुपयांच्या गैरव्यवहाराची प्रकरणे समोर आल्याचा उल्लेख करत, या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच बाधित शेतकऱ्यांचे ‘वर्क कोड’ पुन्हा सक्रिय करून त्यांना न्याय देण्याची मागणीही निवेदनातून करण्यात आली आहे.







