NH-44 वर भरधाव ट्रकचा कहररोड कामगाराला चिरडले; युवक ठार, दोघे जखमीपिंपळखुटी जवळील दुर्घटनेने परिसरात हळहळ प्रमोद रामटेके तालुका प्रतिनिधी पांढरकवडा
पांढरकवडा : राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 44 वर पिंपळखुटी जवळ सुरू असलेल्या रोडच्या कामादरम्यान भरधाव ट्रकने मजुरांना जोरदार धडक दिल्याने एक तरुण जागीच ठार झाला, तर अन्य दोघे जखमी झाल्याची दुर्दैवी घटना शनिवारी 9 मे रोजी सकाळी घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून मृताच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.मृत युवकाचे नाव अतुल मोरेश्वर मंगाम वय 22, रा. मारेगाव वन, ता. केळापूर, जि. यवतमाळ असे आहे. तो राष्ट्रीय महामार्गावरील रोडच्या कामावर रोजमजुरीचे काम करत होता. दि. 09 मे 2026 रोजी सकाळी अंदाजे 09.10 वाजताच्या सुमारास पिंपळखुटी जवळ झाडे कापण्याचे व सुरक्षा कोन लावण्याचे काम सुरू होते. त्याचवेळी नागपूरवरून हैदराबादकडे भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रक क्रमांक NL 01 AJ 4520 ने रोडवरील मजुरांना मागून जोरदार धडक दिली. या भीषण धडकेत अतुल मंगाम गंभीर जखमी झाला. तसेच इतर दोन कामगारही जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच कुटुंबीय व पोलीस घटनास्थळी दाखल झाले. जखमींना तातडीने रुग्णवाहिकेद्वारे उपजिल्हा रुग्णालय पांढरकवडा येथे हलविण्यात आले. मात्र डॉक्टरांनी अतुल मंगाम याला मृत घोषित केले. मृतकाचे वडील मोरेश्वर मानकू मंगाम यांनी पांढरकवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ट्रक चालकाने निष्काळजीपणे व भरधाव वेगाने वाहन चालवून अपघात घडविल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी पांढरकवडा पोलिसांनी ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास पोहेका.गजानन पत्रे करीत आहे. महामार्गावरील कामांदरम्यान सुरक्षा उपाययोजनांकडे दुर्लक्ष होत असल्याचा प्रश्नही या निमित्ताने पुन्हा ऐरणीवर आला आहे.







