संजय लांबे तालुका प्रतिनिधी ब्रम्हपुरी
ब्रह्मपुरी : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या १०० वर्षांच्या गौरवशाली प्रवासावर आधारित प्रेरणादायी नाट्यप्रयोगाला ब्रह्मपुरीतील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत सभागृह खचाखच भरून गेले. या नाट्य प्रयोगाचा हा १०१वा प्रयोग हा ब्रम्हपुरीत होत असल्याची माहिती निर्माता दिग्दर्शक संजय पेंडसे यांनी यावेळी दिली तेव्हा सभागृह टाळ्यांच्या कडकडाटात दुमदुमले. ब्रह्मपुरी अर्बन सेवा प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित करण्यात आलेला हा भव्य नाट्यप्रयोग शनिवार, दि. ९ मे २०२६ रोजी सायंकाळी ७ वाजता ने. हि. महाविद्यालय, ब्रह्मपुरी येथे संपन्न झाला.कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी मंचावर विभाग संघचालक श्री जयंतराव खरवडे, ज्येष्ठ प्रचारक श्री रवींद्रजी भुसारी, विभाग कार्यवाह श्री सुभाष इटणकर, ब्रह्मपुरी अर्बन बँकेचे अध्यक्ष तथा माजी आमदार प्रा. अतुलभाऊ देशकर, उपाध्यक्ष श्री रवींद्र अष्टेकर, संचालक श्री दत्ताजी कात्यायन तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी श्री जयंत श्रीवास्तव उपस्थित होते.राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक परमपूजनीय डॉ. केशवराव बळीरामपंत हेडगेवार, द्वितीय सरसंघचालक पूजनीय श्री गुरुजी (माधव सदाशिव गोलवलकर) तसेच तृतीय सरसंघचालक बाळासाहेब देवरस यांच्या राष्ट्रकार्याचा प्रेरणादायी इतिहास या नाट्यप्रयोगातून जिवंत करण्यात आला. संघाच्या स्थापनेपासून ते समाजजीवनातील विविध क्षेत्रांमध्ये केलेल्या कार्याचा प्रभावी आढावा कलाकारांनी रंगमंचावर साकारला.नागपूर व पुणे येथील तब्बल ३० कलाकारांच्या सहभागामुळे नाट्यप्रयोग अधिक प्रभावी आणि आकर्षक ठरला. संवाद, संगीत, प्रकाशयोजना आणि नेपथ्य यांच्या उत्कृष्ट संगमामुळे उपस्थित प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले. विविध प्रसंगांना प्रेक्षकांकडून टाळ्यांचा कडकडाट मिळत होता.कार्यक्रमाचे संचालन श्री अरविंद नंदुरकर यांनी केले. पाहुण्यांचा परिचय श्री रवींद्र अष्टेकर यांनी करून दिला, तर प्रास्ताविक श्री जयंत श्रीवास्तव यांनी केले.कार्यक्रमाला ब्रह्मपुरी शहर व परिसरातील नागरिक, युवक, महिला तसेच विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. राष्ट्रभक्ती, सामाजिक समरसता आणि संघटनशक्तीचा संदेश देणारा हा नाट्यप्रयोग प्रेक्षकांच्या मनावर विशेष छाप पाडून गेला.ब्रह्मपुरी अर्बन सेवा प्रतिष्ठानच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने करण्यात आले होते. प्रवेश पूर्णतः मोफत असल्याने नागरिकांनी मोठ्या उत्साहाने उपस्थिती दर्शवली.कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल उपस्थित नागरिकांनी आयोजक ब्रह्मपुरी अर्बन सेवा प्रतिष्ठानचे अभिनंदन केले.







