संजय शिंदे
तालुका प्रतिनिधी इंदापूर
भिगवण : आजच्या वेगवान व तंत्रज्ञानप्रधान युगात लहान मुलांवर मोबाईल, इंटरनेट व आधुनिक जीवनशैलीचा वाढता प्रभाव पडत असून, त्यांच्या नैतिक व सांस्कृतिक जडणघडणीसमोर आव्हाने निर्माण होत आहेत. या पार्श्वभूमीवर भावी पिढी सुसंस्कारित, शिस्तबद्ध व आध्यात्मिकदृष्ट्या सक्षम व्हावी, या उद्देशाने जय बाळूमामा बहुउद्देशीय आध्यात्मिक वारकरी शिक्षण संस्थेच्या वतीने भव्य “बाल संस्कार शिबिर” व पंचदिनी नामस्मरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
हे शिबिर शनिवार, दि. १ मे २०२६ रोजी प्रारंभ होणार असून मंगळवार, दि. ५ मे २०२६ रोजी संगता होणार आहे.मसोबानगर, देवकाते वस्ती, मदनवाडी (ता. इंदापूर, जि. पुणे) येथे या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.या शिबिरामध्ये विद्यार्थ्यांना केवळ धार्मिक नव्हे तर सर्वांगीण विकास घडविणाऱ्या विविध उपक्रमांचा समावेश करण्यात आला आहे. योगासने, प्रार्थना, श्रीमद्भगवद्गीता अध्ययन, मृदुंग वादन, वारकरी भजन, हरिपाठ, संत चरित्र यांसारख्या विषयांद्वारे विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, संयम, कर्तव्यभावना व संस्कारांचे बीजारोपण केले जाणार आहे. तसेच, नामस्मरणाच्या माध्यमातून मानसिक शांती व एकाग्रता वाढविण्यावर विशेष भर दिला जाणार आहे.शिबिरासाठी सकाळपासून सायंकाळपर्यंत नियोजित दिनचर्या ठेवण्यात आली आहे. सकाळी योगासने व प्रार्थनेने दिवसाची सुरुवात होईल, त्यानंतर गीता अध्ययन, मृदुंग व गायन प्रशिक्षण, तसेच दुपारनंतर भजन-कीर्तन व हरिपाठाचे सत्र आयोजित केले जाणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांचा शारीरिक, मानसिक व बौद्धिक विकास साधण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.शिबिरात सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी काही नियम व अटी निश्चित करण्यात आल्या आहेत. शिबिरात प्रवेश विनामूल्य असून, ७ ते २२ वयोगटातील विद्यार्थ्यांना सहभागी होता येणार आहे. विद्यार्थ्यांनी स्वतःची आवश्यक सामग्री सोबत आणावी तसेच शिस्त व नियमांचे पालन करणे बंधनकारक राहणार आहे.या उपक्रमासाठी विजय उर्फ आणा देवकाते पाटील यांचे मार्गदर्शन लाभत असून, विशेष सहकार्य म्हणून सर्जेराव आप्पा देवकाते, किसन नरुटे, तुषार दादा देवकाते, माऊली थोरात यांचे विशेष सहकार्य लाभणार आहेत.मदनवाडी देवकाते वस्तीतील ग्रामस्थ व विविध कार्यकर्त्यांचे सहकार्य लाभत आहे. युवा कीर्तनकार तथा राष्ट्रीय पुरस्कार विजेते ह. भ. प. शिवाजी महाराज शेंडे यांचेही मार्गदर्शन या शिबिराला लाभणार आहे.अधिकाधिक विद्यार्थ्यांनी या शिबिरात सहभागी होऊन संस्कारमय शिक्षणाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. अधिक माहितीसाठी मो. ९५५२०७४२४२ / ९३५६३८३६५५ या क्रमांकांवर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.


