ज्ञानदेव राजनकर तालुका प्रतिनिधी जळगांव जामोद
जळगाव जामोद:स्थानिक सातपुडा शिक्षण संस्था संचालित तथा डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला संलग्नित स्वातंत्र्यवीर गणपतराव इंगळे कृषी महाविद्यालय येथील अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांकडून दुधाविषयी विविध चाचण्याचे प्रात्यक्षिक सादर करण्यात आले.दूध हे आपल्या आहारातील मुख्य घटक असून, पूर्वीच्या काळापासून भारतीय संस्कृतीत दुधाला महत्त्व दिले जाते. तसेच दैनंदिन वाढत्या वापरामुळे दुधात भेसळीचे प्रमाण वाढत आहे. दुधामध्ये विविध घटक जसे की पाणी, स्टार्च, युरिया आणि इतर रासायनिक पदार्थ मिसळणे आणि दुधाचे प्रमाण वाढवणे असे विविध प्रकार उत्पादन खर्च कमी करण्यासाठी केले जातात.दुधातील भेसळ जाणून घेणे अत्यंत आवश्यक आहे, त्याकरिताच महाविद्यालयातील अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांनी अतिशय सुलभ पद्धतींचा वापर करून दुधाच्या गुण नियंत्रण चाचण्यांविषयी प्रात्यक्षिके प्रा.कु.नम्रता खिरोडकर यांच्या मार्गदर्शनाखाली सादर करण्यात आली.यावेळी कृषी व उद्यानविद्या महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.योगेश गवई उपस्थित होते आणि त्यांनी अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शकांचे कौतुक केले तसेच भविष्यात या चाचण्यांचा उपयोग करून भेसळमुक्त दुधाचा पुरवठा कसा वाढवता येईल यासाठी आपण सर्व प्रयत्नशील असणे गरजेचे आहे, असे आवाहन याप्रसंगी करण्यात आले.









