दिपक पगारे
शहर प्रतिनिधि, औरंगाबाद
औरंगाबाद , दि. 24: कोरोना निर्बंध असतांना छुप्या पद्धतीने विक्री करणाऱ्या शहरातील शेकडो छोट्या-मोठ्या व्यापाऱ्यांवर जिल्हाधिकारी, पोलिस आयुक्त व महापालिका प्रशासकांनी कारवाई करत दुकानांना सील ठोकले. शिवाय लाखो रुपयांचा दंडही वसुल केला. या कारवाईचा मोठा गवगवा देखील करण्यात आला. परंतु महापालिकेने सील केल्यानंतर अवघ्या 2 तासांत शहरातील एक प्रसिध्द मिठाई भांडार उघडण्यात आले. यावरून खासदार इम्तियाज जलील यांनी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, पोलिस आयुक्त निखील गुप्ता, महापालिका प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांच्यावर तोफ डागली आहे.
खा.इम्तियाज जलील यांनी सायंकाळी 4.00 PM वाजता फेसबुक लाइव्हद्वारे संवाद साधला . कुणाच्या दबावाखील येऊन संबंधित मिठाईचे दुकान उघडण्यात आले, कुणाकुणाला मिठाई मिळाली ? असा सवाल देखील खा.इम्तियाज जलील यांनी याप्रसंगी केला . गेल्या महिनाभरापासून शहरातील सर्व दुकाने बंद आहेत. व्यवसाय बुडाल्याने अनेक छोटे व्यापारी हतबल झाले आहेत. पावसाळा तोंडावर असल्याने दुकानात पाणी शिरून मालाचे नुकसान होण्याची भिती व्यक्त करत व्यापाऱ्यांनी दिवसांतून काही तास दुकाने उघडण्याची परवानगी मिळावी अशी मागणी केली होती.


