संजय शिंदे
जिल्हा प्रतिनिधी पुणे
येथील भैरवनाथ महाराज यात्रा उत्सव दि.१० व ११ एप्रिल रोजी सालाबाद प्रमाणे संपन्न होत आहे.सध्या येथील यात्रा कमिटीवर प्रशासकाची नियुक्ती करण्यात आलेली आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासकीय समितीची बैठक ग्रामपंचायत कार्यालय भिगवण येथे नुकतीच पार पडली.यावेळी यात्रेच्या वर्गणीसाठी जबरदस्ती करण्यात येऊ नये तसेच अनावश्यक खर्च टाळण्यात यावा अशी मागणी येथील ग्रामस्थांनी निवेदनाद्वारे केली आहे.सदरचा यात्रा उत्सव पारंपरिक पद्धतीने,सालाबाद प्रमाणे साजरा करत असताना स्वेच्छेने वर्गणी जमा करण्यात यावी तसेच सध्या व्यापार उद्योगावर असलेले युद्धाचे सावट तसेच अवकाळी पावसाने झालेले शेतकऱ्यांचे नुकसान, व्यवसायातील मंदीचे झालेले विपरीत परिणाम यामुळे व्यापारी,व्यावसायिक,शेतकरी आर्थिक संकटाचा सामना करीत आहेत त्यामुळे यात्रा वर्गणीसाठी जबरदस्ती न करता स्व इच्छेने घ्यावी अशी मागणी करण्यात आली आहे. गावामध्ये विविध सण, उत्सव,जयंती,पुण्यतिथी वर्गणी जमा करून साजरे केले जातात या साठी येथील ग्रामस्थ आणि छोटे मोठे व्यावसायिक,व्यापारी स्वेच्छेने वर्गणी देत असतात. परंतु सध्या जागतिक युद्धजन्य परिस्थिती मुळे व इतर कारणामुळे बाजारपेठेवर विपरीत परिणाम होऊ लागले आहेत त्यामुळे यात्रेसाठी होणारा अनावश्यक खर्च कमी करून स्व इच्छेने वर्गणी जमा करून यात्रा उत्सव साजरा करण्यात यावा अशी मागणी आप्पासाहेब गायकवाड यांनी ग्रामस्थांच्या वतीने केली आहे.यावेळी बैठकीसाठी सहा.धर्मादाय आयुक्त कार्यालय,पुणे येथील अधिकारी प्रज्ञा कांबळे,स्वाती राऊत,(निवासी नायब तहसीलदार, इंदापूर), लक्ष्मीकांत मुळे (मंडल अधिकारी),अमर खसाळे (ग्राम महसूल अधिकारी), दत्तात्रय परदेशी (ग्रामपंचायत अधिकारी, भिगवण) व ग्रामस्थ उपस्थित होते.
चौकट:
भिगवण येथील यात्रेच्या वर्गणीबाबत चर्चा करण्यात आलीनागरिकांना अडचणी असल्याने
सदरची वर्गणी कोणालाही बंधनकारक करू नये, तसेच यात्रेचा अनावश्यक खर्च टाळण्यात यावा आणि वर्गणी ग्रामपंचायत मध्ये जमा करण्यात यावी असे निर्देश देण्यात आले आहेत
– स्वाती राऊत,निवासी नायब तहसीलदार,इंदापूर
ग्रामस्थ स्वखुशीने व स्वेच्छेने देतील तेवढी वर्गणी घेण्यात यावी याची चर्चा बैठकीमध्ये करण्यात आली आहे.
– लक्ष्मीकांत मुळे, मंडल अधिकारी भिगवण





