संजय शिंदे
जिल्हा प्रतिनिधी पुणे
भिगवण येथील वॉर्ड क्र १ मध्ये गेल्या आठ दिवसापासून दुरुस्ती साठी खुले केलेले चेंबर उघड्यावर ठेवण्यात आले असून त्यामुळे अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे. उघडे ड्रेनेज चेंबरमुळे दुचाकीस्वार पडणे, वाहने रुतणे आणि भीषण अपघात होण्याची शक्यता वाढली आहे विशेषतः रात्रीच्या अंधारात हे चेंबर,खड्डे न दिसल्याने गंभीर दुखापत किंवा जीवितहानीचा धोका निर्माण झाला आहे.परंतु ग्रामपंचायत प्रशासन मात्र याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप येथील रहिवाश्यांनी केला आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की, गेल्या आठ दिवसापूर्वी येथील गटार लाइन तुंबल्याने नागरिकांच्या घरात सांडपाणी शिरले होते यावर ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी सदरचे काम करण्यासाठी ते उघडे केले. परंतू तद्नंतर अद्याप पर्यंत त्याची दुरुस्ती करण्यात आलेली नसल्याने त्याठिकाणी अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे. त्या परिसरातून दोन चाकी,चार चाकी वाहनांची नियमित रहदारी असते त्यामुळे अपघात झाल्यास त्यास जबाबदार कोण? असा प्रश्न उपस्थित होत आहे. तसेच चेंबर उघडे असल्याने आणि त्यातून सांडपाणी वाहत असल्याने त्या परिसरात मोठ्या प्रमाणावर अस्वच्छता व दुर्गंधी पसरली आहे त्यामुळे रोगराई पसरण्याची भीती येथील ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.दुर्गंधीमुळे तेथून जाताना नागरिकांना नाक दाबून जावे लागत आहे.याबाबत ग्रामपंचायत अधिकारी दत्तात्रय परदेशी यांचेशी संपर्क साधला असता त्यांनी सदर चेंबर दुरुस्त करण्याच्या सूचना संबंधित ठेकेदाराला दिल्या असल्याचे सांगितले.





