संजय शिंदे
जिल्हा प्रतिनिधी पुणे
विदर्भातील ज्येष्ठ राजकारणी, माजी मंत्री, शिक्षण तज्ञ स्व.दत्ता मेघे यांच्या कुटुंबीयांची राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी नागपूर येथे शनिवारी (दि. 28) भेट घेऊन सांत्वन केले.देशाच्या व राज्याच्या राजकारणामध्ये दीर्घकाळ काम केलेले,लोकाभिमुख नेते असलेले दत्ता मेघे यांचे हृदयविकाराने रविवारी (दि. 22 मार्च) निधन झाले. त्यांचे पुत्र माजी आ. सागर मेघे, आ. समीर मेघे यांचे हर्षवर्धन पाटील यांनी या भेटीत सांत्वन केले. स्व.शंकररावजी पाटील व स्व.दत्ता मेघे यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते. तसेच स्व.दत्ता मेघे यांचे समवेत सन 2000 मध्ये राज्य मंत्रिमंडळामध्ये मंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली, त्यावेळी त्यांनी नेहमी मार्गदर्शन केले. तसेच नंतरच्या काळामध्ये ते दिल्लीला गेल्यावरही वेळोवेळी त्यांचे मार्गदर्शन लाभले. एक आदर्श व दूरदृष्टी असलेले राजकारणी म्हणून त्यांची राज्यामध्ये ओळख होती. राज्याच्या राजकीय, शैक्षणिक, सामाजिक क्षेत्राची त्यांच्या निधनाने मोठी पोकळी निर्माण झाल्याचे हर्षवर्धन पाटील यांनी याप्रसंगी नमूद केले.







