दिपक पगारे
शहर प्रतिनिधि,औरंगाबाद
औरंगाबाद, दि.24 लॉकडाऊन व संचारबंदीमुळे अॅटोरिक्षाचे हफ्ते भरता न आल्याने आणि रिकव्हरी एजंट यांनी सतत त्रास दिल्यामुळे राजीवनगर झोपडपट्टी, रेल्वेस्टेशन परिसर येथील आत्महत्या करणाऱ्या २७ वर्षीय युवक भिमराव राजु साबळे यांच्या घरी खासदार इम्तियाज जलील यांनी आज भेट देवुन परिवाराचे सांत्वन केले. मयत यांच्या विधवा पत्नी, आई व भावांची यांची विचारपुस करुन एमआयएम पक्षाच्या वतीने आर्थिक मदत ही केली.
दर सोमवारी कोरोना बाबत जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात येणाऱ्या उपाययोजना वर जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी आणि जिल्हा प्रशासनाचे संबंधित अधिकारी यांची आढावा बैठक असते. सदरील बैठकीत फक्त चर्चा होवुन सर्वसामान्याच्या बाबतीत काहीच तोडगा निघत नसल्याने आणि जनतेच्या उदरनिर्वाह साठी राज्य शासन व जिल्हा प्रशासनाच्या वतीने दाखविण्यात येणाऱ्या उदासिनतेमुळे खासदार इम्तियाज जलील यांनी सदरील बैठकीवर बहिष्कार टाकला.
बैठकीस उपस्थित न रहाता अॅटोरिक्षाचे हफ्ते भरता न आल्यामुळे आत्महत्या करणाऱ्या भिमराव राजु साबळे यांच्या घरी भेट देवुन त्यांची विधवा पत्नी राजश्री भिमराव साबळे व आईची विचारपुस करुन त्यांच्या सर्व अडीअडचणी, समस्या व बँकवाल्यांनी कशाप्रकारे त्रास दिला याची माहिती घेतली. खासदार इम्तियाज जलील पाहताच मयताची विधवा पत्नी व आईचे अश्रु अनावर झाले होते. मयत भिमराव राजु साबळे यांच्यावर आई, पत्नी व त्यांच्याहुन लहान सहा भावांची संपुर्ण पालनपोषणाची जबाबदारी होती. मयताचे घर टिनशेडचे असुन विद्युत पुरवठा हि नसल्यासारखेच आहे, एवढ्या हलाखाच्या परिस्थितीत जीवन जगत असुन, लॉकडाऊनमुळे शाळा ही बंद असल्याने शाळकरी मुलांचे भाडे मिळणे ही बंद झाल्याने त्यांचे पत्नी व आई हे रस्त्यावरील भंगार जमा करुन घरचे उदरनिर्वाह करत असल्याचे मयताच्या पत्नीने खासदार इम्तियाज जलील यांना सांगितले.
खासदार इम्तियाज जलील यांनी प्रखर टिका करतांना आरोप लावले की, राज्य व जिल्हा प्रशासनाच्या उदासिनतेमुळे, प्राथमिकता कोणत्या कामांना द्यावी आणि गोरगरीबांच्या वस्तुस्थितीची माहितीच नसल्यामुळे ऑटोरिक्षा चालक आत्महत्या करत आहे. गोरगरीबांना उदरनिर्वाहाची व्यवस्था करुन लॉकडाऊन व संचारबंदी केली असती तर युवकांना त्यांचे जीव देण्याची वेळच आली नसती. गोरगरीब परिवार सध्या कोणत्या परिस्थितीत जीवन जगत आहे, कसे मरणयात्ना भोगत आहे याची जाणीव मोठमोठ्या एसी हॉलमध्ये बैठक घेणाऱ्या अधिकाऱ्यांना कधिच कळणार नाही.
प्रधानमंत्री आणि मुख्यमंत्री भाषणतच व्यस्त राहतात – खासदार इम्तियाज जलील
खासदार इम्तियाज जलील यांनी प्रधानमंत्री आणि मुख्यमंत्री यांना विनंती केली की, टि.व्ही. वर येवुन भाषण देण्यापुर्वी गोरगरीब जनतेची काळजी घ्यावी. केंद्र व राज्य शासनाला खरोखर जनतेची काळजी असती तर आज युवकांवर आत्महत्या करण्याची वेळच आली नसती. आत्महत्या करणाऱ्या युवकांची आणि गोरगरीबांवर उदरनिर्वाह करण्याची नामुष्की ओढावल्याची सर्वेस्वी जबाबदारी ही सरकारचीच आहे. मयत युवक साबळे सारखी इतर दुर्देवी घटना शहरात किंवा राज्यात कोणत्याही ठिकाणी होणार नाही याची दक्षता घेवुन शासनाने लवकरात लवकर गोरगरीबांना मदत कशी केली जावु शकते त्याचा विचार करावा असे प्रतिपादन खासदार इम्तियाज जलील यांनी केले.
फायनान्सवाल्यांची दादागीरी खपवुन घेतली जाणार नाही – खासदार इम्तियाज जलील
कोरोना महामारीच्या व संचार बंदीच्या काळात फक्त अत्यावश्यक व वैद्यकीय सेवेशी निगडीत उद्योगांना परवानगी देण्यात आलेली आहे. इतर सर्व प्रकारचे कामधंदे, उद्योग व पर्यटन स्थळे बंद असल्याने अॅटोरिक्षा व इतर प्रवासी वाहने चालविणाऱ्या गोरगरीब मालक व चालक यांच्यावर उपासमारीची वेळ येवुन आर्थिक परिस्थिती हलाखिची झालेली आहे. त्यांच्याजवळ जेवण करण्यासाठी पैसे नाही ते बँकेचे हफ्ते कुठुन भरणार ? खाजगी बँक आणि फायनान्स कंपन्या गोरगरीबांकडून हफ्ते वसुली करण्यासाठी गुंडांना घरी पाठवुन दमदाटी करुन धमक्या देत आहेत अश्या प्रकारची दादागीरी, गुंडागर्दी कदापिही खपवुन घेतली जाणार नाही. शासनाने अॅटोरिक्षा चालवण्यास परवानगी दिली परंतु जनतेला घरात बसविले, मग रिक्षात बसणार कोण ? वास्तविकता न जाणता दिलेल्या परवानगीचा उपयोग काय ? असे गंभीरस्वरुपाचे प्रश्न उपस्थित करुन अॅटोरिक्षा चालकाच्या आत्महत्यास जेवढे खाजगी बँक व फायनान्स कंपन्या जबाबदार आहे तेवढेच जिल्हा प्रशासनही जबादार असल्याचे खासदार इम्तियाज जलील यांनी सांगितले.
आत्महत्यास प्रवृत्त करत असल्याचे यापुर्वीच पत्राव्दारे कळविले होते – खासदार इम्तियाज जलील
औरंगाबाद जिल्ह्यातील खाजगी बँका व फायनान्स कंपन्यांनी बँकेचे हफ्ते वसुली करण्यासाठी बाउंन्सर, गुन्हेगारी पाश्र्वभुमी असलेले गुंड प्रवृत्तीच्या लोकांना गोरगरीब मालक व चालक यांच्याकडे सकाळी व मध्यरात्रीच्या वेळी पाठवत आहे. सदरील रिकव्हरी एजेंट गुंड प्रवृत्तीचे असल्याने ते वसुली करण्यासाठी बळजबरी करणे, दादागिरी करुन घरातील व्यक्तींना व महिलांना धमकावणे तसेच सर्रासपणे अर्वाच्च भाषेचा वापर करुन आत्महत्येस प्रवृत्त करण्याचे काम करत असल्याचे यापुर्वीच जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण आणि पोलीस आयुक्त निखिल गुप्ता यांना पत्राव्दारे कळविले होते.
त्यानंतर सुध्दा आजतगायत संबंधितांवर कोणत्याही प्रकारची कार्यवाही जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आली नसल्याचे खासदार इम्तियाज जलील यांनी सांगितले. यानंतर मयत साबळे सारखी दुर्देवी घटना शहरात पुन्हा घडली तर त्याची सर्वस्वी जबाबदारी जिल्हा प्रशासनाची असणार असे खासदार इम्तियाज जलील यांनी स्पष्ट केले.
मयत साबळे यांच्या चिठ्ठीत बँक हफ्त्यांचा उल्लेख
मयत भिमराव राजु साबळे यांनी आत्महत्या करण्यापुर्वी चिठ्ठित नमुद केले होते की, पोलीस सर माझा आत्महत्या करायचं कारण एकच आहे माझ्या वर लोन असल्याने मी आत्महत्या करीत आहे. लॉकडाऊन मुळे मी हफ्ते भरु शकत नाही त्यामुळे मि टॉरचर झाले म्हणुन मि आत्महत्या करतोय.
बँकवाल्याचे गुंडे घरी येवुन व सतत कॉल करुन मानसिक त्रास देत असल्यामुळे त्यांनी आत्महत्या केल्याचा थेट आरोप मयत साबळेच्या घरच्यांनी लावला.


