संतोष भवर शहर प्रतिनिधी अंबड
अंबड शहरातील चिखली अर्बन बँकेच्या अंबड शाखेजवळ पित्तीनगरमध्ये जाण्या येण्यासाठी असलेल्या जुन्या रस्त्यामध्ये केलेले अनधिकृत अतिक्रमण त्वरित हटविण्यात यावे व संबंधित बांधकाम बंद करण्यात यावे या मागणी संदर्भात बाबासाहेब खरात यांनी अंबड नगर परिषद समोर सुरु केलेले आमरण उपोषण आज (ता.20) गुरुवारी तिसऱ्या दिवशी मुख्याधिकाऱ्यांच्या लेखी पत्रानंतर स्थगित करण्यात आले आहे. या अतिक्रमण संदर्भात ठोस पुरावे असतांना देखील अंबड नगर परिषद राजकीय व आर्थिक अमिषाला बळी पडत गप्प बसली असल्याचा आरोप करतांनाच सदर अतिक्रमण लवकरात लवकर हटविण्याची मागणी बाबासाहेब खरात यांनी केली. दरम्यान आज मुख्याधिकारी मनोज उकिर्डे यांनी बाबासाहेब खरात यांची भेट घेवून सदर जागा ही महाराष्ट्र शासनाच्या मालकीची असल्याचे सांगून त्या बाबत न्यायालयात याचिका चालू असल्याचे म्हटले आहे. त्यांच्या लेखी पत्रानंतर बाबासाहेब खरात यांनी आपली तक्रार व कागदपत्रे तहसीलदार किंवा उपविभागीय अधिकारी यांच्याकडे फॉरवर्ड करण्यात यावी अशी मागणी करून आपण आपले आमरण उपोषण तात्पुरते स्थगित करत असल्याचे सांगितले.











