संतोष पोटपिल्लेवार
तालुका प्रतिनिधी, घाटंजी
घाटंजी:- छत्रपती महोत्सव समिती, घाटंजीच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली. फाल्गुन वद्य द्वितीया, दिनांक १७ मार्च २०२५ रोजी छत्रपती चौक, गिलानी कॉलेज समोर घाटंजी येथे या भव्य सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.कार्यक्रमाची सुरुवात शिवपूजनाने झाली. त्यानंतर शहरातील प्रतिष्ठित व्यक्तींचा व समाजसेवकांचा सत्कार करण्यात आला. यामध्ये घाटंजीचे सुपुत्र, पुणे महानगर पालिकेचे उपायुक्त मा. प्रविणजी ठाकरे आणि घाटंजीतील सामाजिक कार्यकर्ते महेश पवार यांचा विशेष गौरव करण्यात आला. तसेच, शहरातील पत्रकार बांधवांचाही सन्मान करण्यात आला.कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून मा. प्रा. विठ्ठलजी कांगणे सर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. त्यांनी युवकांना स्वतःचे विश्व निर्माण करून आई-वडिलांची मान उंचावण्याचा संदेश दिला. तसेच, छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनकथेवरून प्रेरणा घेत कठोर परिश्रम, शिस्त आणि ध्येयधोरण ठरवण्याचे महत्त्व अधोरेखित केले.या कार्यक्रमाच्या मंचावर प्रविणजी ठाकरे, सतीशजी मलकापुरे, सामाजिक कार्यकर्ते महेश पवार, नामदेवराव आडे, सुनीलजी देठे, संजयजी गोडे, अरविंदराव जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कैलास राऊत आणि वैभव मलकापूरे यांनी केले. प्रास्ताविक निखिल देठे यांनी केले, तर आभार प्रदर्शन पराग गंडेचा यांनी मानले.छत्रपती महोत्सव समिती, घाटंजीतर्फे या कार्यक्रमास सहकार्य करणाऱ्या सर्व नागरिकांचे, मान्यवरांचे आणि आयोजकांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले.


