भरत पुंजारा ग्रामीण प्रतिनिधी पालघर
सिलवासा येथील विनोबा भावे रुग्णालयात प्रसूतीसाठी दाखल असलेल्या शेवंती गंगा टोकरे (सिंदोनी, दादरा नगर हवेली) यांना 27 फेब्रुवारी 2025 रोजी तातडीने B+ रक्तगटाच्या रक्ताची आवश्यकता भासली. त्यांच्या कुटुंबीयांनी यारी दोस्ती ग्रुपकडे मदतीची याचना केली.या आवाहनाला तात्काळ प्रतिसाद देत जव्हार येथील शैलेश रामू मौळे, यारी दोस्ती ग्रुपचे सदस्य, यांनी रात्री बारा वाजता सिलवासा रुग्णालयात जाऊन रक्तदान केले. त्यांच्या या तत्परतेमुळे शेवंती टोकरे यांना वेळेवर उपचार मिळाले आणि त्यांचे प्राण वाचले.यारी दोस्ती ग्रुपच्या सामाजिक बांधिलकीचे हे कार्य कौतुकास्पद आहे. गरजूंसाठी तत्परतेने मदतीचा हात देणाऱ्या या संस्थेने समाजासमोर एक हृदयस्पर्शी उदाहरण ठेवले आहे. शैलेश मौळे यांच्या या कार्याचे स्थानिक स्तरावर मोठ्या प्रमाणावर कौतुक होत आहे.या घटनेने यारी दोस्ती ग्रुपचे सामाजिक सहकार्य आणि आपुलकीचे नाते अधोरेखित झाले आहे. अशा निःस्वार्थ सामाजिक संस्थांमुळे गरजू रुग्णांना मदतीचा मोठा आधार मिळतो. समाजातील इतर व्यक्तींनीही या कार्यातून प्रेरणा घ्यावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.











