संजय डोंगरे ग्रामीण प्रतिनिधी माना
माना येथून जवळच असलेल्या कुरुम परिसरात दिवसेंदिवस चोरीच्या घटना वाढत चालल्या असून,परिसरात विहिरीतील मोटर पंप चोरी व आता चोरट्यांनी एवढी मजल मारली की थेट दोन घरात घुसून दीड लाख रुपयांची रोकड लंपास केल्याची घटना 23 तारखेच्या मध्यरात्री कुरुम या गावी घडली. पोलिसांनी दिलेल्या प्राप्त माहितीनुसार माना पोलीस स्टेशनच्या हद्दीत येत असलेल्या कुरुम या गावातील गुलशन नगर येथे चोरट्यांनी दोन घरांना बाहेरून कुलूप लावून सुमारे दीड लाखाची रोकड लंपास केल्याची घटना घडली. यावर माना पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहे.शेख जावेद शेख जावीर वय 40 वर्ष राहणार कुरुम हे आपल्या कुटुंबीयसह 23 फेब्रुवारीच्या रात्री आपल्या घरात झोपले असताना त्यांच्या घराचा दरवाजा बाहेरून उघडून दाराची कळी व कुलूप तोडून, चोरी केली. अर्ध्या रात्री त्यांच्या पत्नी लघुसंखेसाठी उठल्यावर हा प्रकार त्यांच्या लक्षात आला. व त्यांनी शेजारी राहणाऱ्या त्यांच्या वडिलांना आवाज दिला व बाहेरून लावलेला दरवाजा त्यांनी उघडला. शेख जावेद शेख जावीर यांनी त्यांच्या प्लॉट विक्रीतून आलेली 90 हजार रुपयाची रोकड ही पेटीतून चोरीस गेल्याचे त्यांना दिसून आले. तसेच त्यांच्या शेजारीच राहणाऱ्या तालीम बेग सत्तार बेग यांनी तुरीची विक्री करून आणलेले 60 हजार रुपये अज्ञात चोरट्यांनी कपाटातून लंपास केले. याप्रकरणी माना पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, चोरीचा तपास लागावा म्हणून घटनास्थळी ठसे तज्ञ व श्वान पथकाला पाचारण करण्यात आले असून घटनेची दखल घेत मूर्तिजापूर चे उपविभागीय पोलीस अधिकारी मनोहर दाभाडे यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाच्या सूचना दिल्या. याप्रकरणी माना पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंदविण्यात आला. व अधिक तपास माना पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुरज सुरवशे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.


