भरत पुंजारा
ग्रामीण प्रतिनिधी पालघर
डहाणू तालुका विधी सेवा समिती, डहाणू तलासरी तालुका वकील संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने बाडापोखरण येथील सरस्वती विद्या मंदिर येथे शासकीय योजनांचा महामेळावा आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान डहाणू न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश एच.एन. पोले यांनी भूषविले. शासकीय योजनांची माहिती आणि लाभ तालुक्यातील नागरिकांना मिळावा, यासाठी या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अँड. सुनंदा बेलकर यांनी केले. यावेळी न्यायालय, महसूल, वनविभाग, आरोग्य विभाग, आदिवासी विकास प्रकल्प, पोलिस प्रशासन, कृषी विभाग, पंचायत समिती शिक्षण विभाग, शालेय विविध योजना, बालविकास प्रकल्प विभाग यांच्या अधिकाऱ्यांनी विविध योजनांची सविस्तर माहिती दिली. सहदिवाणी न्यायाधीश गुलाटी मॅडम यांनी नागरिकांनी सायबर गुन्हे आणि लहान मुलांच्या अन्यायाविरुद्ध सतर्क राहावे, असे सांगितले. तसेच वाणगाव पोलिस ठाण्याचे एपीआय तुषार पाचपुते यांनी गुन्हे नोंदणीतील अडचणी आणि सायबर गुन्ह्यांपासून बचाव कसा करावा, याविषयी मार्गदर्शन केले. अँड. राहुल कडू यांनी बाल अत्याचार प्रतिबंधक (पोक्सो) कायद्याची माहिती दिली. न्यायालयाच्या आदेशानुसार ग्रामीण व आदिवासी भागांमध्ये आयोजित मार्गदर्शन शिबिरांमुळे स्थानिक नागरिकांना मोठा फायदा होत आहे, असे मत सामाजिक कार्यकर्ते तथा डहाणू न्यायालयाचे अँड. विराज गडग यांनी व्यक्त केले. आरोग्य विभागाचे डॉ. गणेश पांचाळ, कृषी विभागाचे दीपक गावित, वनविभागाचे वाल्मीक पाटील, महा ई-सेवा केंद्राचे किशोर बारी, समाजकल्याण विभागाचे संतोष विटकर, संविधान तज्ज्ञ प्रशांत मर्दे आणि सुशांत शेलार यांनी आपल्या विभागाच्या योजनांची माहिती नागरिकांना दिली. कार्यक्रमासाठी वकील संघटनेचे अध्यक्ष डी.जे. इराणी, अँड. कुबल, सरकारी वकील तडवी, अँड. दिनेश वंजारी, अँड. राहुल कडू, अँड. विराज गडग, अँड. संतोष बारी, अँड. डी.डी. पाटील, अँड. धर्मेंद्र बोथरा, अँड. नलिन बारी, अँड. दिनेश दौडा, संगीता चौधरी, तसेच अनेक सरपंच, अंगणवाडी सेविका, बचत गटाच्या महिला, शाळेचे शिक्षकवृंद, विविध शासकीय विभागांचे कर्मचारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यासाठी डहाणू न्यायालयाचे वकील नलिन बारी यांनी विशेष मेहनत घेतली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माधुरी बारी यांनी केले, तर आभार प्रदर्शन अँड. राकेश मडवे यांनी केले.

