मकरंद जाधव तालुका प्रतिनिधी श्रीवर्धन
“प्रदूषणमुक्त भारत” चा संदेश सर्व भारतीयांना देण्यासाठी काश्मीर ते कन्याकुमारी मोहीम सुरु करणाऱ्यांची ऐमुंबईतील पाच सायकलस्वारांनी प्रभादेवीच्या सिद्धिविनायकाचं दर्शन घेऊन १६ जानेवारी २०२५ रोजी श्रीनगरच्या ऐतिहासिक लाल चौकातून आपल्या सायकल यात्रेला प्रारंभ केला. या मोहिमेचे प्रमुख सतीश जाधव यांच्या नेतृत्वाखाली मंगल भानुशाली, जितेंद्र जैन, जयंती गाला आणि मनोज चौगुले या ५४ ते ६७ वयोगटातील ज्येष्ठ सायकलस्वारांचं जम्मू झोनचे अतिरिक्त पोलिस महासंचालक आनंद जैन यांनी स्वागत करुन मोहिमेला झेंडा दाखवून पुढील प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या. काश्मीर, दिल्ली, पंजाब, राजस्थान, गुजरात, महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, केरळ, तामिळनाडू या राज्यातून चार हजार अठ्ठेचाळीस किलोमीटरची एका वेगळ्या मार्गाची हि मोहीम कोणतही वाहन न घेता सर्व सामानासहित चाळीस दिवसांत पूर्ण करण्याचं उद्दिष्ट या सायकलस्वारांनी ठेवलं आहे. प्रत्येक गावात, जिल्ह्यात, शहरात सायकल चालवा आणि पर्यावरण वाचवा हा प्रदूषणमुक्तीचा संदेश देत जागरुकता निर्माण करत निघालेली हि सायकल यात्रा चारशे किलोमीटरचा टप्पा पार करुन पंजाबमधील फिरोजपूरला पोहोचल्यानंतर काउंटर इंटेलिजेंसचे सहाय्यक महानिरीक्षक लखबीर सिंग, विवेकानंद वर्ल्ड स्कूलचे अध्यक्ष डॉ.गौरव सागर भास्कर आणि प्राचार्य तजिंदर पाल कौर यांच्यासह इतर कर्मचारी आणि शाळेतील विद्यार्थ्यांनी या सायकल स्वारांच्या पथकाचं स्वागत केलं. इथल्या शाळेत प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्याला उपस्थितीत असलेले शाळेचे प्राध्यापक व सुमारे दोन हजार विद्यार्थ्यांजवळ संवाद साधताना सायकल चालवणं हे चांगल्या आरोग्याची गुरुकिल्ली आहे त्यामुळे पर्यावरणाचं रक्षण होण्यास मदतच होणार आहे. आपण वाहतुकीच्या पद्धती, ऊर्जा वापरामध्ये बदल करून कार्बन फुटप्रिंट कमी करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. या आवाहनाला प्राध्यापक व विद्यार्थ्यांकडून सायकलच्या वापराबाबत सकारात्मक प्रतिसाद मिळाला. पर्यावरण जागरूक जीवनशैलीला प्रोत्साहन देण्याच्या या कार्याबद्दल विवेकानंद वर्ल्ड स्कूलच्या वतीनं सायकलस्वारांना स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आलं. प्रदूषणमुक्तीचा संदेश देत स्वच्छ, हरीत भारत निर्माणाचं उद्दिष्ट घेऊन नागरिकांमध्ये जनजागृती निर्माण करण्यासाठी निघालेल्या या महत्वाकांक्षी सायकल मोहिमेला मुंबईतील प्रभादेवीच्या सिद्धीविनायक मंदिराजवळ आर्मीचे ब्रिगेडियर नरेंद्र सिंग तर दादर येथील श्री शिवाजी पार्क येथे आयपीएस अधिकारी आणि सायकलिस्ट श्री कृष्ण प्रकाश यांनी शुभेच्छा दिल्या. यावेळी घोडबंदर सायकल क्लब, आम्ही सायकल प्रेमी, समर्पयामि सायकल्स, पेडल वॉरियर्स आणि जायंट सायकलिंग क्लबचे सायकलिस्ट उपस्थित होते.देशाच्या रक्षणासाठी सैनिक प्राण पणाला लावतात. पोलीस आपलं रक्षण करतात. मग आम्ही वरिष्ठ युवा देशासाठी काय करु शकतो ? या संकल्पनेतून प्रदूषणमुक्त भारताचा संदेश देण्यासाठी आम्ही काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत एका वेगळ्या मार्गानं सायकल मोहिमेचं आयोजन केलं. सायकल चालवल्याने आपण तंदुरुस्त राहण्याबरोबरच प्रदूषणमुक्त देश या मोहिमेला हातभार लावू शकतो. त्यामुळे सर्वांनी जास्तीत जास्त सायकलचा वापर करावा.सतीश जाधवसंघ प्रमुखसायकल मोहीम

