सचिन संघई जिल्हा प्रतिनिधी वाशिम
वाशिम :- श्री प.दी जैन कला महाविद्यालय अनसिंग राष्ट्रीय सेवा योजना पथकाद्वारा दत्तक ग्राम देगाव येथे राष्ट्रीय सेवा योजना विशेष शिबिरातर्फे दिनांक 9/ 2/ 2025 रोजी पशुचिकित्सा व पशुलसीकरण शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरासाठी डॉ. गणेश भोयर पशुधन पर्यवेक्षक (वारा जहागीर) प्रशिक्षणार्थी डॉ. गणेश सोळे, प्रशिक्षणार्थीं डॉ. सुनील पातळे प्रशिक्षणार्थी डॉ. आकाश वैद्य यांना आमंत्रित करण्यात आले होते. या शिबिराच्या आयोजनासाठी एक दिवसापूर्वी रासेयो स्वयंसेवकामार्फत दत्तक गावात प्रचार करण्यात आला. जनावरांमधील जंतरोग, लंपिरोग पायखुरी, तोंडखोरी अशा विविध आजाराची तपासणी करण्यात आली जनावरांमधील संसर्गजन्य रोगाला प्रतिबंध घालण्यासाठी गावातील १७६ विविध प्रकारच्या जनावराचे लसीकरण करण्यात आले तसेच राष्ट्रीय सेवा योजना शिबिरातर्फे जनावरासाठी मोफत लिव्हर टॉनिकचे वाटप करण्यात आले. पशुचिकित्सा तथा पशूलसीकरण शिबिराची सुरुवात सकाळी ७:३० वाजता झाली आणि सकाळी १०:३० पर्यंत पशुलसीकरणाचे काम चालले. या शिबिरासाठी श्री. सुनील वऱ्हाडे आणि श्री.संजय जोगदंड या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे विशेष सहकार्य लाभले.

