मारोती बारसागडे
जिल्हा प्रतिनिधी गडचिरोली
गडचिरोली : जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यातील लखमापूर बोरी येथील अंगणवाडी सेविका वर्षा सातपुते यांचा भारताच्या ७६ व्या प्रजासत्ताक दिनी दिल्ली येथे सत्कार करण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्यातून विविध विभागातील २३ कर्तव्यपद महिलांना दिल्ली येथे निमंत्रित करण्यात आले होते. त्यापैकी राज्यातून ६ अंगणवाडी सेविका व १ नोडल अधिकारी एकूण ७ कर्तव्यपद महिलांचा समावेश आहे. महिला व बाल विकास नागपूर विभागातून गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यातील लखमापूर बोरी येथील अंगणवाडी सेविका वर्षा ताताजी सातपुते यांनी गडचिरोली जिल्ह्याचे प्रतिनिधित्व केले होते. महिला व बालविकास आयुक्तालय नागपूर व जिल्हा परिषद गडचिरोली येथून त्यांची निवड करण्यात आली. दिल्ली येथे प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमाप्रसंगी महिला व बालविकास केंद्रीय मंत्री अन्नपूर्णा देवी व राज्यमंत्री सावित्री ठाकूर यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच राज्यातील ६ अंगणवाडी सेविकांसह महाराष्ट्र राज्याला पोषण ट्रॅकरमध्ये प्रथम क्रमांक मिळवणाऱ्या नोडल अधिकारी उपायुक्त उज्वला पाटील यांनाही स्मुर्तीचिन्ह देऊन गौरविण्यात आले.अंगणवाडी सेविका वर्षा सातपुते यांनी गडचिरोली जिल्ह्याचे प्रतिनिधीत्व करून नागपूर विभागातून एकमेव सन्मानित झाल्याबद्दल तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंह , उपमुख्य कार्यकारी अधिकारी अर्चना इंगोले, तालुका बाल विकास प्रकल्प अधिकारी विनोद हटकर, विस्तार अधिकारी गजानन भांडेकर, पर्यवेक्षिका श्रद्धा गंदाटे, प्रकल्पातील सर्व पर्यवेक्षिका व अंगणवाडी सेविकांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

