सुधीर घाटाळ
ग्रामीण प्रतिनिधी डहाणू
सिलवासा (दादरा-नगर हवेली) येथे चालक-मालक संघटना व वीरशैव भजनी मंडळाच्या वतीने आयोजित अखंड शिवनाम सप्ताह व ग्रंथराज परमरहस्य पारायण सोहळ्याच्या दुसऱ्या दिवशी, श्री. शि. भ. प. तानाजी पाटील थोटवाडीकर यांनी आपल्या प्रभावी कीर्तनाच्या माध्यमातून समाजप्रबोधन केले.गेल्या २५ वर्षांपासून कीर्तन सेवेच्या माध्यमातून सामाजिक विषयांवर परखड मतं मांडणारे तानाजी पाटील थोटवाडीकर यांनी कालच्या कीर्तनात शिवपाठातील अभंगांच्या आधारे आधुनिक समाजजीवन, तंत्रज्ञानाचा वाढता प्रभाव आणि कुटुंबसंस्थेतील बदलांवर प्रकाश टाकला. मोबाईलच्या अतिवापरामुळे संवाद कमी होऊन कुटुंब आणि समाज यामध्ये निर्माण होणाऱ्या दुराव्याबाबत त्यांनी उपस्थितांना जाणीव करून दिली. तसेच, नामस्मरण व सद्विचारांनी समाजात सकारात्मक बदल घडविण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.या वेळी दिलीप चिलबिले, हनुमंत चिकनपुरे, गजानन पाटील यांच्यासह बसव मित्र मंडळ, डहाणू तसेच अनेक भक्तगण, महिला, पुरुष व लहान मुले मोठ्या संख्येने उपस्थित होती. मराठी संस्कृतीचे जतन आणि प्रचार-प्रसार हिंदी भाषिक केंद्रशासित प्रदेशात होत असल्याचे हे उदाहरण निश्चितच कौतुकास्पद आहे.