सुधीर घाटाळ ग्रामीण प्रतिनिधी डहाणू
पालघर जिल्ह्यातील भारतीय मार्क्सवादी लेनिनवादी पक्ष (भा.मा.ले.) ने २०२४ च्या विधानसभा निवडणुकीसाठी पालघर आणि विक्रमगड या दोन विधानसभा मतदारसंघात लढण्याचे निश्चित केले आहे. पक्षाच्या विक्रमगड येथील कमिटीच्या बैठकीत, काॅ. काशीनाथ पागी यांना विक्रमगड विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्याचा निर्णय झाला आहे. या बैठकीचे नेतृत्व जिल्हा सेक्रेटरी काॅ. शिवराम पाटील यांनी केले. पालघरसाठी अद्याप उमेदवार ठरलेला नसला तरी पक्षाने दोनही जागांवर निवडणूक लढविण्याचा निर्धार केला आहे.२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत काॅ. राहुल मेढा हे पक्षाचे अधिकृत उमेदवार होते. त्या निवडणुकीत पालघर विधानसभेत मोठ्या प्रमाणात मतं मिळाल्याने इतर पक्षांचे लक्ष वेधले गेले होते. आता विधानसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवारांना त्याचा फटका बसण्याची शक्यता आहे. आगामी काही दिवसांत उमेदवारांची अंतिम यादी निश्चित होईल, असे डहाणू तालुका सचिव काॅ. नरेश शिरोंदे यांनी सांगितले.