भरत पुंजारा ग्रामीण प्रतिनिधी पालघर
पालघर,वेती-डहाणू तालुक्यातील वेती बुंधेपाडा येथे वीज पडून घर उध्वस्त झालेल्या गं.भा. मनुका कमलाकर बाहोटा यांना यारी दोस्ती फाउंडेशनने २१ ऑक्टोबर २०२४ रोजी किराणा सामान देऊन छोटीशी मदत केली. दोन दिवसांपूर्वी झालेल्या या घटनेत मनुकाचे पूर्ण घर, जीवनावश्यक वस्तू, कपडे, भांडी, तांदूळ, भाजीपाला आणि महत्त्वाचे कागदपत्रे, जसे रेशनकार्ड, आधार कार्ड, मतदान कार्ड आणि जातीचे दाखले, जळून खाक झाले.मनुकाचा एक मुलगा बाहेर गावी गेला होता तर दुसरा मुलगा रोजगारानिमित्त रत्नागिरी येथे गेला होता. घटनेच्या दिवशी त्या एकट्याच होत्या. रात्रीचे जेवण करून शेजारी झोपण्यासाठी गेल्यानंतर काही वेळातच त्यांच्या घरावर वीज कोसळली. सुदैवाने कोणतीही जिवीतहानी झाली नसली, तरी आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणात झाले आहे.दुहेरी दुःखात असलेल्या मनुका बाहोटा यांना आधार म्हणून यारी दोस्ती फाउंडेशनने त्यांना तांदूळ, भाजीपाला, मसाले, तेल, साबण, आणि लुगडे अशा जीवनावश्यक वस्तू दिल्या. फाउंडेशनचे सदस्य म्हणाले, “आमची फाउंडेशन नेहमीच समाजातील गरजेवेळी लोकांच्या मदतीसाठी तत्पर असते. या वेळीदेखील आम्ही आवश्यक असलेली मदत केली आहे.”मनुकाच्या कुटुंबीयांनी यारी दोस्ती फाउंडेशनचे आभार मानले असून, या मदतीमुळे त्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे.








