प्रशांत सूर्यवंशी तालुका प्रतिनिधी तळोदा
तळोड्यातील श्री क्षत्रिय नवयुवक गणेश मंडळ हे आपल्या विविध नवोपक्रमामुळे जिल्ह्यातच नव्हे तर राज्यस्तरावर देखील नावलौकिक प्राप्त झालेले मंडळ असून नुकतेच या मंडळामार्फत सलग तिसऱ्या वर्षीही सातपुड्यातील अति दुर्गम भागात राहणाऱ्या लोकांना कपडा बँक मार्फत कपडे वाटप करण्यात आले.श्री क्षत्रिय नवयुवक गणेश मंडळ हे दहा दिवस चालणाऱ्या गणपती उत्सवात विविध उपक्रम तर राबवितच असते पण सामाजिक बांधिलकी जपून सदर मंडळ हे गणपती उत्सवाच्या आधी व नंतर देखील विविध उपक्रम राबवित असते. नुकतेच सदर मंडळामार्फत समाजातील बांधवाकडून वापरण्यायोग्य कपडे स्वच्छ धुवून मागविण्यात आले होते. सर्व कपडे मंडळामार्फत चालविण्यात येणाऱ्या कपडा बँकेत जमा केले. त्या सर्व कापड्यांची विगतवारी करून म्हणजेच लहान मुलांचे, स्त्रियांचे व पुरुष मंडळीचे असे वेगवेगळे करून गरजू लोकांना संपर्क साधून काल दिनांक 22 रविवार रोजी स्वखर्चाने मंडळाचे युवा कार्यकर्ते सातपुड्याच्या अतिदुर्गम भागात जाऊन कपडे वाटप करून आले.मंडळाने केलेल्या या कार्यामुळे परिसरात चर्चा होत असून कपडे प्राप्त झालेल्या लोकांनी आभार व्यक्त करून मिळालेल्या चांगल्या प्रतीच्या कपड्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून आला व सगळ्यांनी समाधान व्यक्त केले. सदर कपडे वाटपावेळी श्री क्षत्रिय नवयुवक गणेश मंडळाचे उपाध्यक्ष, सचिव व कोषाध्यक्ष व सर्व संचालक मंडळ, सदस्य व गणेश भक्त उपस्थित होते.