यादवराव मनपुर्वे ग्रामीण प्रतिनिधी तामसा
तामसा – तळेगाव येथील मयताचा अंत्यविधी करताना निर्माण झालेल्या वादावरून अंत्यविधीस अडवणूक करणाऱ्या विरुद्ध कार्यवाही करा या मागणीसाठी तामसा पोलीस स्टेशन समोर तळेगाव येथील नागरिकांनी ठिय्या मांडला होता याबाबत मिळालेली माहिती अशी की, मौजे तळेगाव तालुका हादगाव येथील मयत सारनाथ दत्ता राऊत यांच्या अंत्यविधीसाठी दि. १७ रोजी सकाळी १० :०० वाजताच्या दरम्यान तयारी सुरू होती. स्मशानभूमीत जाण्यासाठी रस्ता व्यवस्थित नसल्याने मयताच्या नातेवाईकांकडून जेसीबीच्या सहाय्याने नाली काढत असताना गावातील बालाजी जाधव व इतरांनी त्यांना त्याबाबत मज्जाव करून मयताच्या नातेवाईकास जातिवाचक शिवीगाळ केली असा मयताच्या नातेवाईकांकडून आरोप करण्यात आला. अंत्यविधी थांबवून तळेगाव येथील मयताच्या नातेवाईकांनी तामसा पोलीस स्टेशन गाठून संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल झाल्याशिवाय आम्ही येथून जाणार नसल्याचे सांगून कार्यवाहीचा आग्रह धरला होता.दरम्यान आक्रमक झालेल्या मयताच्या नातेवाईकांनी प्रचंड जमाव जमवल्याने पोलिसांची मात्र चांगलीच दमछाक झालीअखेर सुदाम नागोराव राऊत यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तामसा पोलिसात आरोपींविरुद्ध ॲट्रॉसिटी ॲक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.