दिनानाथ पाटील तालुका प्रतिनिधी शहादा
शहादा : आधी देश मग पक्ष आणि त्यानंतर मी स्वतः या त्रिसूत्रीवर माझे काम सुरू आहे व नियमित सुरू राहील. मी कधीही पक्ष सोडणार नाही. या वावड्या हेतुपुरस्सर पसरविल्या जात असल्याचे आमदार राजेश पाडवी यांनी सांगितले. आमदार राजेश पाडवी यांच्या पक्ष बदलाच्या वावड्या राजकीय पटलावर आणून पक्षात बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात असल्याने आमदार कार्यालयाकडून प्रेस नोट प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, माझ्या सामाजिक व राजकीय जन्म भारतीय जनता पक्षात झाला असून परिसरामध्ये विकासाची नांदी करण्याचे ध्येय घेऊन नियमित प्रेरित होतो. प्रशासकीय अधिकारी असताना नेहमीच सामाजिक कार्याच्या माध्यमातून बदल घडविण्यासाठी राजकीय शक्तिंसोबत असावे लागते म्हणून भारतीय जनता पक्षाची राष्ट्राप्रती, विश्वाप्रती असणारी सखोल विचारधारा मला नेहमीच आवडत राहिली आहे. म्हणून मी देव, देश, धर्माच्या कार्यासाठी या विचारधारेचा पूर्वीपासून अनुयायी आहे व यापुढे देखील याच प्रमाणे नियमित राहील यात तीळ मात्र शंका नाही. मागील काही दिवसांपासून अन्य विचारधारेच्या पक्षाच्या संपर्कात आहे असे खोटे वातावरण विरोधकांच्या वतीने तयार करण्यात येत आहे. परंतु मी ठरवलेल्या विकासाचा दृष्टिकोन मला स्पष्टपणे भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून दिसतो या शासनाने जनतेसाठी केलेले धोरण कल्याणकारी आहे व मी त्याशी पूर्णपणे सहमत असल्यामुळे कुठेही जाऊन राजकीय बदल करण्याच्या मानसिकतेमध्ये अथवा कोणताही अन्य पक्षाच्या किंवा पदाधिकाऱ्यांच्या संपर्कात मी नाही. यामुळे कुणीही कोणत्याही अफवांना बळी पडण्याचे काहीही कारण नाही असे मला स्पष्टपणे सांगावेसे वाटते. माझ्यासारख्या कार्यकर्त्याला पक्षाने प्रशासकीय सेवेतून एका मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी दिली, विविध राज्यांच्या निवडणुकांमध्ये प्रभारी केले पक्षाने माझ्यावर प्रचंड विश्वास दाखवला मी त्या विश्वासाला पात्र ठरण्यासाठी सतत प्रयत्नशील आहे.