सुमेध दामधर ग्रामीण प्रतिनिधी संग्रामपूर
सोनाळा :- संग्रामपूर तालुक्यातील सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या अंबाबरवा अभयारण्यातील वाघाने पिंगळी शिवारात संत्र्याच्या बागेमध्ये असल्याचे समोर आले आहे. एका रानडुकराची शिकार केल्याचे समोर आले आहे. शनिवार दिनांक २७ जुलै च्या पहाटे ही घटना घडल्यामुळे पिंगळी परिसरात एकच खळबळ उडाली आहे. त्या अनुषंगाने सोनाळा वनपरिक्षेत्र कार्यालयातील कर्मचाऱ्यांकडून वाघाचा शोध घेणे सुरू आहे. संग्रामपूर तालुक्यातील पिंगळी शिवारात शनिवारी एका संत्र्याच्या बागेत वाघाने रानडुकराची शिकार केली. काही शेतकऱ्यांनी वाघाला पाहाल्याचे सांगण्यात येत आहे. पिंगळी परिसरात वाघाचा वावर असल्याने शेतकऱ्यांसह शेतमुजरांमध्ये ही दहशत पसरली आहे. तसेच आदिवासी ग्राम पिंगळी येथून काही अंतरावर वाघाचा डेरा असल्याने ग्रामस्थांमध्येही भीतीचे वातावरण आहे. वाघाचे तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे. वन जीव विभागाकडून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले गेले आहे. रविवारी वन्यजीव विभागाच्या कर्मचाऱ्यांनी पुन्हा शेत शिवारात शोधमोहीम सुरू केली आहे. संतधार पावसाने अडचणी निर्माण होत असूनही वाघाच्या हालचालीवर वन्यजीव विभागाचे कर्मचारी नजर ठेवून आहेत. दोन दिवसापासून ठाण मांडून असलेल्या वाघ नर आहे की माजी हे स्पष्ट झाले नसले तरी तो वाघ अंबाबरवा अभयारण्यातील असल्याची माहिती वन्यजीव विभागाकडून प्राप्त झाली आहे.