संतोष पोटपिल्लेवार शहर प्रतिनिधी, घाटंजी
घाटंजीः-शिवजयंती उत्सव समिती व राजे छत्रपती सामाजिक संस्था घाटंजी यांच्या वतीने दिला जाणारा वीर राजे संभाजी पुरस्कार हजारो घाटांजीकरांच्या साक्षीने मनोरुग्ण सेवक संदीप शिंदे व सौ नंदिनी संदीप शिंदे यांना वितरित करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आर्णी विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ. संदीप धुर्वे होते. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून य.जि. प कर्मचारी पतसंस्था र न १०९ चे अध्यक्ष मधुकर काठोळे, जितेंद्रबाबू ठाकरे, सुरेश डहाके उपस्थित होते. नंददीप फाउंडेशन व बेघर मनोरुग्ण निवारा केंद्र यवतमाळ चे संस्थापक अध्यक्ष श्री संदीप शिंदे व सौ नंदिनी शिंदे मागील तीन वर्षापासून मनोरुग्णांची सेवा करत असून जवळपास ३९७ मनोरुग्णांना अन्न, वस्त्र व वैद्यकीय उपचार देऊन ठीक करून स्वगृही पाठवले आहे. समाजाने नाकारलेल्या मानसिकदृष्ट्या, खचलेल्या या मनोरुग्णांना पुन्हा माणूस बनवण्याच्या त्यांच्या प्रयत्नांची दखल घेत त्यांना यावर्षीचा वीर राजे संभाजी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी बोलताना संदीप शिंदे यांनी समाजाने मनोरुग्णांचे पालक व्हावे व त्यांना पुन्हा प्रवाहात आणण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे असून आपण हाती घेतलेल्या कामाला अनेकांचा मदत मिळत असल्यामुळे आता हे काम आपण आजन्म करणार असल्याचे मत व्यक्त केले. डॉ. संदीप धुर्वे यांनी अध्यक्षीय भाषणातून संदीप शिंदे यांनी मनोरुग्णांच्या सेवेतून नवा आदर्श उभा केला असून प्रत्येकाने त्यांच्या कामात हातभार लावणे गरजेचे आहे असे सांगत नंददीप फाउंडेशन करता ५१ हजार रुपयांचा निधी घोषित केला. यासोबतच शिवजयंती उत्सवामध्ये यवतमाळ जिल्ह्यातून उत्कृष्ट कार्य करणाऱ्या विभूतींचा सन्मान कर्तुत्वाचा सोहळा पार पडला. यामध्ये राज्य कर निरीक्षक ईश्वरी ओळंबे, आयटीआय स्पर्धेत देशातून प्रथम आलेली अश्विनी इंगळे, सारेगमप महाराष्ट्र उपविजेती गीत बागडे बागडे व वरिष्ठ पत्रकार अविनाश साबापुरे यांचाही सन्मान करण्यात आला. पहिल्या सत्रात प्राध्यापक प्रेमकुमार बोके यांचे छत्रपती शिवरायांचे राज्यकारभार विषय धोरण व सद्यस्थिती या विषयावर अभ्यासपूर्ण व्याख्यान झाले. त्यानंतर शिवतीर्थावर वेशभूषा स्पर्धा व सामान्य ज्ञान स्पर्धा संपन्न झाली. स्पर्धांचे बक्षीस वितरण यवतमाळ जिल्हा काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस जितेंद्र मोघे ,मध्यवर्ती बँकेचे संचालक आशिष लोणकर, किशोरभाई दावडा, डॉ. अरविंद भुरे, रुपेश कल्यमवार यांचे हस्ते करण्यात आले. यानंतर हास्य कलाकार तथा हिंदी चित्रपट अभिनेता सुनील पाल यांचा कॉमेडी नाईट विथ सुनील हा मनोरंजन पर कार्यक्रम पार पडला. सकाळी निघालेल्या बाईक रॅलीमुळे सर्व शहर शिवजयंतीमुळे झाले होते. दोन दिवस चाललेल्या शिवजयंती उत्सवाच्या कार्यक्रमांचे संचलन दीपक महाकुलकर, प्रास्ताविक राजेश उदार तर आभार रुपेश कावलकर यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राहुल खर्चे प्रफुल अक्कलवार, अनिल मस्के, राजू गिरी, भास्कर वेट्टी, नितीन मुद्दलवार , आकाश चिल्कावार, नंदू बुरबुरे, कृष्णा महल्ले यांनी परिश्रम घेतले.