दिनेश आंबेकर
तालुका प्रतिनिधी जव्हार
जव्हार : दरवर्षीप्रमाणे नवीन वर्षाच्या सुरुवातीला एसटी महामंडळ सुरक्षित प्रवासाच्या दृष्टीने एसटी सुरक्षितता अभियान राबित असते. यंदा हे अभियान ११ ते २५ जानेवारी २०२४ दरम्यान राबविण्यात येणार आहे. रस्ते वाहतुकीमध्ये सुरक्षित प्रवासाला अनन्यसाधारण महत्त्व आहे, गेल्या ७६ वर्षात सुरक्षित प्रवास हा एस टी महामंडळाचा मुख्य उद्देश आहे, त्यामुळे सर्वसामान्य प्रवाशांच्या मनामध्ये विश्वासह्रतेची व सुरक्षित प्रवास होणार ही भावना निर्माण केली आहे. वर्षभर अपघात टाळण्यासाठी प्रशिक्षण, प्रबोधन, विविध वैद्यकीय चाचण्या अशा विविध उपक्रमातून एसटीच्या चालकांना विना अपघात बस चालवण्याचे प्रोत्साहन दिले जाते. या अभियानाचा शुभारंभ आज दि- ११ जानेवारी २०२४ रोजी दुपारी १२ वाजता जव्हार बसस्थानकात करण्यात आला. यावेळी सदर कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून पालघर जिल्हा कोकण विभाग पत्रकार संघाचे अध्यक्ष चित्रांगण घोलप हे उपस्थित होते. यावेळी बोलताना चित्रांगण घोलप यांनी सांगितले की, जव्हार तालुका हा डोंगराळ भाग आहे, त्यामुळे या ठिकाणी घाट रस्ते असुन तीव्र स्वरूपाची वळणे आहेत, तसेच रस्ते बऱ्यापैकी खराब झालेले आहेत. घाटातील रस्त्यांच्या संरक्षक भिंती तुटल्यामुळे रस्ते काही ठिकाणी खचलेले आहेत, तसेच रस्त्याच्या दुतर्फा झूडपे वाढल्यामुळे वळणामधील गाड्या दिसत नसल्यामुळे अपघात होण्याची शक्यता आहे . एसटी चालक जिव मुठीत धरुन गाडी चालवत असतात व प्रवाशांची देखील जबाबदारी त्यांच्यावर असते त्यामुळे रस्त्याच्या समस्यांबाबत आगार व्यवस्थापकांनी जिल्हाधिकारी व सार्वजनिक बांधकाम विभाग यांना पत्रव्यवहार करणे गरजेचे आहे. एसटीतील प्रवाशांचा भरोसा आपल्यावर असल्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून एसटी चालकांनी या भागात एसटी चालविताना वेगावर नियंत्रण ठेवून एसटी चालविली पाहिजे, तसेच मोबाईल फोनचा वापर देखील टाळला पाहिजे अशे बहुमोल मार्गदर्शन चित्रांगण घोलप यांनी या वेळी केले. यावेळी आगार व्यवस्थापक राकेश देवरे यांनी सांगितले की रस्त्यावरील इतर खाजगी वाहनांच्या तुलनेत जव्हार एसटी आगाराच्या अपघाताची संख्या अत्यंत कमी आहे. याचे सर्व श्रेय एसटी चालक व वाहकांचे आहे, असे बोलून त्यांनी पूर्ण वर्षभरात प्रवाशांना सुरक्षित प्रवास घडविण्याचे अभिवचन एसटी महामंडळ देत असल्याचे सांगितले, तसेच खराब रस्ते व रस्त्याच्या दुतर्फा वाढलेली झुडपे याबाबत प्रशासनाला पत्रव्यवहार करणार असल्याचे देखील त्यांनी सांगितले.या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन स्थानक प्रमुख विपुल अवतार यांनी केले. यावेळी एसटी आगाराचे योगेश करमरकर, जिजाऊ संघटनेचे प्रल्हाद कांगणे जव्हार एसटी आगाराचे चालक, वाहक मोठ्या संख्येने उपस्थित होते.