कैलास शेंडे
तालुका प्रतिनिधी, तळोदा
तळोदा:येथिल नेमसुशिल प्राथमिक विद्यामंदिरातील इ.३ री तील विद्यार्थ्यांना शाळेच्या आवारातच मेंढीच्या कार्याविषयी माहिती करून देण्यात आली.औचित्य होते इयत्ता 3 रीत असणाऱ्या परिसर अभ्यास क्रमातील विषयाचे,त्यात मेंढी विषयी संकल्पना स्पष्ट करण्यात आली होती.ती संकल्पना विद्यार्थ्यांना मेंढी समोर जाऊन विशद करण्यात आली.त्यात नकळतपणे मेंढीकडून होत असलेले निसर्गाचा समतोल राखणारे कार्य समजून देण्यात आले.कार्याबाबत माहिती देताना सांगण्यात आले की, मेंढीसारखा केसाळ प्राणी हा शाकाहारी असून नेहमी झुडपांची पाने खातो. त्यावेळी मेंढीच्या केसात काही वनस्पतींच्या बिया अडकतात.ती मेंढी दुसऱ्या ठिकाणी गेल्यावर शारीरिक हालचालीमुळे बिया तिथे पडतात. त्यामुळे वेगवेगळ्या ठिकाणी वनस्पतींची नवीन रोपे तयार व्हायला मदत होते. म्हणजे मेंढी आणि वनस्पती एकमेकांना मदत करतात. हे समजून घेण्याचा प्रयत्न विद्यार्थ्यांनी देखील केला प्रत्यक्ष मेंढीच्या अंगावर अडकलेल्या बिया ह्या विद्यार्थ्यांना दाखविण्यात आल्या.या उपक्रमासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका पुष्पा बागुल यांच्या मार्गदर्शनाखाली वर्गशिक्षक देवेंद्र शिंपी यांनी विद्यार्थ्यांना मेंढी या प्राण्याचे जीवन कार्य समजवून दिले .या उपक्रमाचे संस्थेचे अध्यक्ष निखिलकुमार तुरखिया, संचालिका सोनाबेन तुरखिया, उपाध्यक्ष दगेसिंग महाले ,सचिव संजय पटेल, संस्थेचे समन्वयक हर्षिलकुमार तुरखिया व मुख्याध्यापिका पुष्पा बागुल आदींनी कौतुक केले.