अयनुद्दीन सोलंकी
तालुका प्रतिनिधी, घाटंजी
घाटंजी, 9 डिसेंबर : राइज फाऊंडेशनने दीड वर्षांच्या अथक परिश्रमातून तयार केलेल्या कोलामी भाषाकोशचा लोकार्पण सोहळा शनिवारी पार पडला. आर्णी – केळापूरचे आमदार डॉ. संदीप धुर्वे यांच्या अध्यक्षतेत झालेल्या या सोहळ्यास माजी जिल्हा परिषद सदस्य लेतू जूनघरे, पर्सिस्टंट फाऊंडेशनच्या सुपर्णा देशपांडे, राइज फाऊंडेशनचे संस्थापक संचालक आचार्य ऋषिकेश खिलारे, क्रांतीवीर शामादादा कोलाम संघटनेचे जिल्हाध्यक्ष राहुल आत्राम, सामाजिक कार्यकर्ते अर्जुन आत्राम यांची प्रमुख उपस्थिती होती.
भाषिक मर्यादांमुळे शिक्षणाच्या प्रवाहापासून दूर राहणाऱ्या कोलाम समाजातील अडीच हजार विद्यार्थ्यांना या कोशाचा लाभ होणार आहे. 7 हजार 500 शब्दांचा समावेश असणाऱ्या या भाषाकोशात एकूण पाच खंड आहेत. प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांच्या अभ्यासगरजांचा विचार करून या कोशाची निर्मिती करण्यात आली आहे. शनिवारी सकाळी घाटंजी येथील श्री. गजानन महाराज मंदिराच्या सभागृहात झालेल्या लोकार्पण सोहळ्यास पांच कोलाम गावातील १२०० पेक्षा जास्त ग्रामस्थ, शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकारी, जिल्हा परिषदेच्या ५४ शाळांतील मुख्याध्यापक, शिक्षकांची उपस्थिती होती. कोलामी पाठोपाठ गोंड समाजातील विद्यार्थ्यांसाठी, 15 हजार भाषाकोशांची निर्मिती आगामी पांच महिन्यात करणार, अशी ग्वाही आमदार धुर्वे यांनी दिली.