सचिन डोळे
ग्रामीण प्रतिनिधी, इंदापुर
कुंभारगाव :उजनी जलाशयात फ्लेमिंगोसह 350 पेक्षा जास्त प्रकारचे आकर्षक परदेशी पाहुण्यांचे आगमन झाले आहे. या परदेशी पाहुण्यांना पाहण्यासाठी मुंबई, पुणे , नाशिक सह अनेक ठिकाणाहून पर्यटक उजनीच्या जलाशयाकडे गर्दी करू लागले आहेत. यंदा जलाशयात पाणी पातळी कमी असल्याने हे परदेशी पक्षी थोडे उशिरा दाखल झाले आहेत. करमाळा , इंदापूर , दौंड , भिगवण परिसरात उजनी जलाशय मधील या रंगीबेरंगी परदेशी पक्षांची विहंगम दृष्य पाहायला मिळत आहेत करमाळा, भिगवण, दौंड आणि नगर जिल्ह्यातील काही ठिकाणी या हजारोंच्या संख्येनी आलेल्या परदेशी पाहुण्यांनी वास्तव्य केले आहे. उजनीचे जलाशय 6 किलोमीटर रुंद आणि 140 किलोमीटर लांब पसरले आहे. जलाशयात मुबलक नैसर्गिक खाद्य, पक्षांच्या ब्रीडिंगसाठी उपयुक्त हवामान यामुळे सैबेरियासह जगाच्या अनेक भागातून हजारो पक्षी नोव्हेंबर सुरू होताच दाखल होण्यास सुरुवात होतात. यंदा मात्र जलाशयात कमी पाणी असल्याने पक्षी उशिरा दाखल झाले आहेत. यात सगळ्यात मोठे आकर्षण असते ते हजारोंच्या संख्येनी आलेल्या फ्लेमिंगो पक्षाचे. याशिवाय पेंटेड स्टोर्क, ओपन बिल स्टोर्क, पर्पल हेरॉन, ग्रे हेरॉन, सीगल, स्पून बील, लार्ज इग्रेट, नाईट हेरॉन आणि अशाच आकर्षक पक्षांची जत्राच या शांत वातावरणात भरलेली असते हे सर्व परदेशी पाहुणे पक्षी पावसाळा सुरू होईपर्यंत या परिसरात मुक्काम करतात. दिवसभर या पक्षांचे नैसर्गिक जीवन अगदी जवळून तर पाहता येते. त्याशिवाय पक्षीप्रेमींना ही एक पर्वणीच असते. सोमवार ते शुक्रवारपर्यंत बहुतांश पर्यटक हे छायाचित्रे काढण्यासाठी आणि या पक्षांचा अभ्यास करण्यासाठी येत असतात. मात्र, शनिवार आणि रविवार मात्र येथे शेकडोंच्या संख्येने पर्यटक या पक्षांना पाहण्यासाठी येतात असे प्रसिद्ध गाईड राहुल डोळे राहुल काळे सागर नगरे अभिषेक लोंढे यांनी सांगितले.
![](https://i0.wp.com/adhikarnama.in/wp-content/uploads/2021/07/41795f06-911f-4a48-906f-66953021f824.jpg?fit=1080%2C1080&ssl=1)
![](https://i0.wp.com/adhikarnama.in/wp-content/uploads/2021/07/41795f06-911f-4a48-906f-66953021f824.jpg?fit=1080%2C1080&ssl=1)