संतोष पोटपिल्लेवार
शहर प्रतिनिधी घाटंजी
घाटंजी:- राज्यासह जिल्ह्यातील अंत्योदय शिधात्रिका धारकांना दरवर्षी एक साडी मोफत देण्याचा निर्णय राज्याच्या सहकार पणन व वस्त्रोद्योग विभागाने घेतला आहे. राज्यातील रास्त भाव दुकानातून ही साडी लाभार्थ्यांना वितरीत केली जाणार आहे. राज्यातील अंत्योदय शिधापत्रिका धारक असलेल्या कुटुंबांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे. अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार ३१ डिसेंबर २०२२ पर्यंत राज्यात अंत्योदय शिधापत्रिकाधारक कुटुंबांची संख्या २४,५८,७४७
इतकी आहे.सदर योजनेसाठी महाराष्ट्र राज्य यंत्रमाग महामंडळ मर्या. नवी मुंबई यांना नोडल संस्था नेमण्यात येत आहे. महामंडळाने त्यांचेकडे नोंदणीकृत असलेल्या राज्यातील यंत्रमाग सहकारी संस्था, सूक्ष्म, लघु व मध्य उद्योग अंतर्गत नोंदणीकृत घटक यांच्याकडून निर्धारित केलेले तांत्रिक निकष विचारात घेवून
साडीचे उत्पादन कार्यक्रम राबवावा.सन २०२३ २४ साठी सदर योजनेकरीता महाराष्ट्र राज्य यंत्रमाग महामंडळाने ई- निविदाद्वारे केलेल्या दर करारानुसार प्रति साडी किंमत महामंडळाच्या सेवाशुल्कासह ३५५ रूपये निश्चित करण्यात आली आहे. राज्यातील रास्त भाव दुकानातून ही साडी शासन निश्चित करेल त्या सणानिमित्त वितरीत केली जाणार आहे.लाभार्थ्यांना साडीचे वितरण करतांना महामंडळाने पॅकींग व अन्य प्रक्रीया पार पाडावी असे १० नोव्हेंबर रोजी काढलेल्या परीपत्रकात नमुद केले आहे.