अयनुद्दीन सोलंकी
तालुका प्रतिनिधी, घाटंजी
घाटंजी – घाटंजी तालुक्यातील चिखलवर्धा येथील घरकुल मंजूर प्रकरणी ज्या लाभार्थ्यांना स्वतःची जागा व नमुना 8 अ नाही अशांना घरकुलाचा लाभ दिल्याची लेखी तक्रार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मैनाक घोष, पंचायत समितीचे गट विकास अधिकारी महेश ढोले यांचे कडे सैय्यद नजीब सैय्यद नबी यांनी लेखी तक्रारीतुन केली आहे. चिखलवर्धा गट ग्रामपंचायत असुन त्यात गोविंदपूर, गवरथडा व चिखलवर्धा या तीन गावांचा समावेश आहे. चिखलवर्धा येथील सरपंच वर्षा किनाके ही अपात्र झाली असल्याने तेथील सरपंच पदाचा प्रभार हे उपसरपंच आकाश नडपेलवार हे प्रभारी सरपंच म्हणून कार्यरत आहे. तसेच चिखलवर्धा येथील घरकुल लाभार्थ्यांकडे जागा व नमुना 8 असलेल्या लाभार्थ्यांना डावलुन ज्या लाभार्थ्यांकडे जागा व नमुना 8 नाही अशा लाभार्थ्यांना घरकुलाचा लाभ देण्यात येत असल्याचा आरोप सैय्यद नजीब सैय्यद नबी यांनी आपल्या लेखी तक्रारीतुन केला आहे. विशेष म्हणजे नविन विवाहीत लोकांना पैशाची मागणी करुन तुमचे नांव ड यादीत समाविष्ट करतो म्हणून पैशाची मागणी करत असल्याचा आरोप सैय्यद नजीब यांनी केला आहे. चिखलवर्धा येथील ग्रामसेवक भगत हे घरकुल लाभार्थ्यांची कोणतीही जागा व नमुना 8 ची पाहणी व सहनिशा न करता तसेच खात्री न करता घरकुलाचे हप्ते काढुन देण्यासाठी शिफारस पत्र देत असल्याचा आरोप लेखी तक्रारीतुन करण्यात आला आहे. चिखलवर्धा येथील बोगस घरकुल लाभार्थ्यांची सखोल चौकशी करून प्रभारी सरपंच व सचिव भगत यांचे विरुद्ध विना विलंब फौजदारी कारवाई करण्याची मागणी सैय्यद नजीब सैय्यद नबी यांनी शासनाकडे केली आहे.
घाटंजी पंचायत समितीचे गट विकास अधिकारी महेश ढोले यांची प्रतिक्रिया घेतली असता, चिखलवर्धा येथील नियमबाह्य घरकुल वाटत प्रकरणी लेखी तक्रार प्राप्त झाली आहे. सदर तक्रारीवरुन सखोल चौकशी करून दोषी आढळलेल्या प्रभारी सरपंच, सचिव व घरकुल लाभार्थ्यांविरोधात नियमानुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
ग्रामपंचायतचे सचिव पुरूषोत्तम भगत यांची प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनी आपला भ्रमणध्वनी उचलला नसुन माहिती देण्यास टाळाटाळ केली आहे.
विशेषतः चिखलवर्धा येथे आदिवासी सरपंच असुन रिक्त झालेल्या सरपंच पदावर अनुसूचित जमाती (ST) समाजाच्या सरपंचाची निवड करण्याची मागणी चिखलवर्धा येथील गावकऱ्यांनी शासनाकडे केली आहे.