अमृत कारंडे
तालुका प्रतिनिधी, जामखेड
चौंडी : आरक्षणासाठी मराठा आणि धनगर समाजाचे दुखणे एकच आहे. घराघरात जा हा लढा तीव्र करा. मग आरक्षण कसे मिळत नाही ते बघू असा इशारा म्हणून जरांगे पाटील यांनी धनगर आरक्षणास आपण समाजाच्या पाठीशी ताकदीने उभी असल्याचे सांगितले.यशवंत सेने तर्फे धनगर आरक्षणासाठी दसरा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याला प्रमुख अतिथी म्हणून जरांगे पाटील यांना निमंत्रित देण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. माजी मंत्री अण्णासाहेब डांगे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमास आमदार प्राध्यापक राम शिंदे, माजी आमदार रामहरी रुपनवर पुणे जिल्हा परिषदेचे कार्यकर्ता सुशीला मोराळे संभाजी ब्रिगेडचे प्रवक्ते संभाजी शिंदे, डॉ. शिवाजीराव राऊत, उज्वला हाके, उत्तम पडळकर, अँड दिलीप खेडतकर, यशवंत सेनेचे बाळासाहेब दोडतले प्रदेश अध्यक्ष माणिकराव दांगडे उपोषण कार्यकर्ते अण्णासाहेब रुपनवर, सुरेश बंडगर, अक्षय शिंदे, नितीन धायगुडे, शांतीलाल कोपनर, शिवाजीराव बंडगर यांच्यासह मोठ्या संख्येने धनगर बांधव उपस्थित होते.मनोज जरांगे पाटील म्हणाले की आरक्षणासाठी धनगर समाजाच्या शेवटच्या घरापर्यंत लाट गेली तर, कोणी तुम्हाला रोखू शकत नाही, मराठा धनगर आपण एकच आहोत. तुम्हाला आमच्या लेकरा बाळाचे भविष्य चांगलं करायचं असेल तर पेटून उठावं लागेल मी तुमच्या पाठीशी ताकदीने उभा राहील. मराठा आरक्षण मिळेपर्यंत सरकारच्या छाताडावर बसणार पण आरक्षण सोडणार नाही. आपल्या लेकरा बाळांना न्याय द्यायचा असेल तर आरक्षण मिळवावेच लागेल. असे त्यांनी सांगितले. यावेळी माजी मंत्री अण्णासाहेब डांगे, यशवंत सेनेचे अध्यक्ष बाळासाहेब दोडतले माजी मंत्री रामहरी रुपनवर, यांची भाषणे झाली. प्रास्ताविक नितीन धायगुडे यांनी केले. आभार किरण धालपे यांनी मानले.