काशिफ अंसारी
तालुका प्रतिनिधी, पालघर
बोईसर : पंधरा वित्त आयोगातील सव्वाचार लाखांचा चुराडा तयार करण्यात आलेल्या लोखंडी पाड्याच्या काँक्रीट रस्त्याची एका महिन्यातच दुरवस्था झाली. त्यामुळे नागरिकांकडून ठेकेदारांवर कारवाईची मागणी जोर धरत आहे.तारापूर एमआयडीसीची सधन ग्रामपंचायत म्हणून बोईसर ग्रामपंचायतीचा उल्लेख आहे. मात्र, याच ग्रामपंचायतीत ठेकेदारांना भ्रष्टाचाराचे कुरण लागल्याचा आरोप स्थानिक नागरिक करत आहेत. पंधरा वित्त आयोगाच्या सव्वाचार लाखांच्या खर्चातून तारापूर बोईसर ग्रामपंचायत हद्दीतील लोखंडी पाडा अंतर्गत ४ लाख १२ हजार ७३ रुपये खर्च करून काँक्रीट रस्त्याचे काम महिन्याभरापूर्वी करण्यात आले. पंचायतीच्या पंधरा वित्त आयोगातून तयार करण्यात आलेल्या या रस्त्यावर अनेक ठिकाणी छोटे-मोठे खड्डे पडले असून, योजनेच्या अधिकाऱ्यांनी या रस्त्याच्या कामाची दक्षता आणि गुण नियंत्रक विभागाकडून चौकशी करण्यात यावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे. त्या वेळी कामाचा दर्जा बघून रस्ता पुढील ५ वर्षे सुस्थितीत राहील, अशी या भागातील ग्रामस्थांना अपेक्षा होती. मात्र, रस्त्याचे काम करणाऱ्या ठेकेदार कंपनीने रस्त्याचे काँक्रीटीकरण तसेच मजबुतीकरण करताना घातलेला घोळ यामुळे रस्त्याचे काम चांगल्या प्रतीचे झाले नाही, असा स्थानिक पातळीवर आरोप होत आहे. मात्र, लाखो रुपयांचा १५ वित्त आयोगाचा निधी खर्च होऊनदेखील काही महिन्यात रस्त्यावर खड्डे पडल्याने स्थानिकांनी कामाच्या दर्जाबाबत नाराजी व्यक्त केली आहे. नुकताच ग्रामपंचायतींचा पदभार स्वीकारला आहे. त्यामुळे संबंधित रस्त्याची पाहणी करून वरिष्ठांना अहवाल पाठवण्यात येईल.- रमाकांत चव्हाण. ग्रामविकास अधिकारी बोईसर, एस्टीमेटप्रमाणे काम न केल्याने संपूर्ण काँक्रीट रस्त्यावरून निघून गेले आहे. फक्त दोन ते तीन उंचीचा काँक्रीट थर देऊन रस्ता अरुंद बनवण्यात आला आहे. त्यामुळे या रस्त्याच्या कामाची चौकशी करून दोषींवर योग्य ती कारवाई करण्यात यावी. – कल्पेश हाडल, स्थानिक