सतिश गवई
तालुका प्रतिनिधी उरण,
उरण: डोंगराळ भागात स्वातंत्र्य पूर्व काळापासून वाडया वास्तव्य करून आहेत.परंतु आता वाडयांवर दरड कोसळण्याच्या घटना घडून अनेकांचा बळी जाण्याचा घटना घडू लागल्या आहेत. नुकतीच खालापूर येथील इर्शाळवाडीवर दरड कोसळून अनेकांचा बळी गेला आहे.तरी अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये या हेतूने उरणमधील डोंगराळ भागात वाडयांची तपासणी करून धोका वाड्यातील वस्तीचे स्थलांतर करण्याची मागणी उरण तालुका मराठी पत्रकार संघाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे. स्वातंत्र्य काळापासून डोंगर कपारीत अगदी लगद वाडया वास्तव्य करून आहेत. यामध्ये अनेक जातीधर्माच्या लोकांचा समावेश आहे. यातील काही वाडयांवर स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे उलटूनही मुलभूत गरजा मिळालेल्या दिसत नाही. एकाद्या व्यक्तीला दवाखान्यात न्यायचा असेल तरी डोली बनवून न्यावे लागत आहे. रस्ता सोडा साधी पिण्याच्या पाण्याची सोय नसल्याचे काही ठिकाणी दिसते. मात्र निवडणुकीत मतांसाठी वेगवेगळी आमिषे दाखविले जाते. अशा अनेक निवडणुका होऊनही परिस्थिती जैसे थे असल्याचे चित्र पाहावयास मिळते. गेली अनेक वर्षे वास्तव्य करून असलेल्या वाड्यांच्या बाजूला असलेल्या डोंगर उन, वारा, पाऊस याचा सामना करीत उभा असतो. त्याचा परिणाम होऊन अचानकपणे दरड कोसळण्याच्या घटना वारंवार घडत असल्याचे दिसते. माळीण, तलीये त्यानंतर दोन ते तीन दिवसापूर्वी खालापूर येथील इर्शाळवाडीवर दरड कोसळून अनेकांचा बळी घेतला आहे. त्यातील २७ जणांचे मृतदेह सापडले. तर इतरांना शासनाने मयत घोषित केले आहे. त्यांना शासनाकडून मदत मिळेल हे जरी खरे असले तरी अशा घटना या नेहमीच घडत राहणार आहेत. शासनाने अशा दुर्घटना टाळण्यासाठी उरण तालुक्यातील डोंगराळ भागातील वाडयांची तपासणी करून अतिधोकादायक असलेल्या वाडयांचे त्वरित स्थलांतर करण्यात यावे. अशी मागणी उरण तालुका मराठी पत्रकार संघाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कडे केली आहे.