संजय भोसले
तालुका प्रतिनीधी ,कणकवली
कणकवली : कासार्डे हायस्कूल मधील २००१-२००२ च्या दहावीच्या बॅच मधील विद्यार्थ्यांच्या वर्गमित्रांचा कट्टा या ग्रुपने शाळा सोडल्यानंतर बर्याच वर्षाने गतवर्षी १२ मे २०२२ रोजी कासार्डे हायस्कूल मध्ये एकत्र जमून काही संकल्प आखले होते.त्यात प्रामुख्याने आपण ज्या शाळेत शिकलो त्या शाळेसाठी काहीतरी करावे, शाळेतील मुलांसाठी काहीतरी करावे या हेतूने वर्गमित्रांचा कट्टा या ग्रुप मधील प्रत्येकजण प्रयत्नशील आहेत आणि या संकल्पनेचा श्री गणेशा यावर्षी आपल्या मराठी शाळेपासून केला आहे. कारण सरकारकडून शाळांना मिळणारे अनुदान दिवसेंदिवस कमी होत चालल्यामुळे मराठी माध्यमाच्या शाळांना अवांतर उपक्रम राबवण्यासाठी निधीची कमतरता भासते. अशावेळी विद्यार्थी शाळेची आवड निर्माण व्हावी यासाठी शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देण्यासाठी वर्गमित्रांचा कट्टा मदत करण्यासाठी सज्ज आहे.यावर्षी कासार्डे जांभुळवाडी आणि ओझरम येथील मराठी शाळेमध्ये ओळखपत्र आणि गणवेश वाटप करण्यात आले आहे.वर्गमित्रांचा कट्टा हा ग्रुप स्थापन करण्यापुर्वी बॅच मधील सर्वांना एकत्र आणण्यासाठी मुकुंद नमसे, सिद्धेश माइनकर, राजेश पाताडे, उज्ज्वला सावंत, विद्याधर नकाशे, रविंद्र माने, दिपेश कानसे, मेघना पालेकर, परशुराम नकाशे यांनी विशेष प्रयत्न केले. त्यामुळेच सध्याच्या काळात या बॅचमध्ये शिक्षण घेतलेले 75% माजी विद्यार्थी या ग्रुप मध्ये कार्यरत आहेत.आत्ताच पार पडलेल्या मदतीत सर्वांचा आर्थिक दृष्ट्या मोलाचा वाटा होता आणि पुढेही राहील. त्याचप्रमाणे सर्व गणवेश आणि ओळखपत्र यासाठी चेतन शेट्ये, नीलकंठ शेट्ये, आतूल पटेल आणि गणेश पेडणेकर यांनी पुढाकार घेवुन या उपक्रमाची पूर्तता केली.दोन्ही शाळांमध्ये मुख्याध्यापक यांनी वर्गमित्रांचा कट्टा या ग्रुप चे आभार मानले आहेत.असेच शैक्षणिक उपक्रम राबविण्याचा प्रयत्न वर्गमित्रांचा कट्टा कायम करत राहतील.